जंगमहट्टी मध्यम प्रकल्पावर विजनिर्मिती प्रकल्प उभारण्याची संदिप आर्दाळकर यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2022

जंगमहट्टी मध्यम प्रकल्पावर विजनिर्मिती प्रकल्प उभारण्याची संदिप आर्दाळकर यांची मागणी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी मध्यम प्रकल्पावर विजनिर्मितीचा प्रकल्प उभा करण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाने पुढाकार घ्यावा व त्यासंदर्भातील सरकारी पातळीवरील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी व तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करुन विजनिर्मिती प्रकल्प उभारावा अशी मागणी अडकूर येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप आर्दाळकर यांनी केली आहे. 

        पावसाळ्यामध्ये मध्यम प्रकल्पांच्या सांडव्यावरून वाहुन जाणाऱ्या पाण्यापासून विजनिर्मितीचे प्रकल्प उभा करून पाणी टंचाई व वीज टंचाई यावर मात करता येईल. चंदगड तालुक्यामध्ये तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी फाटकवाडी मध्यम प्रकल्पावरील वीजनिर्मिती प्रकल्प सुरळीतपणे सुरू आहे. तसेच जांबरे मध्यम प्रकल्पावरील विजनिर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे. याप्रकल्पाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असून सर्व यंत्रसामग्रीचे तपासणीचे काम सुरु आहे. प्रकल्प कार्यान्वीत करण्यासाठीच्या कागदपत्रांची (परमिशन) सरकारी पातळीवर देवाणघेवाण चालू आहे. लाईन चार्जिंगचे काम महावितरण कडील काम अंतिम टफ्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरच विजनिर्मिती सुरु होईल.

         आता जंगमहट्टी मध्यम प्रकल्पावरही विजनिर्मिती करणे काळाची गरज बनली आहे. चंदगड तालुक्यामध्ये तीन मध्यम प्रकल्प व 23 लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. यामाध्यमातून तालुक्यामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याच पाण्याचा उपयोग करून विजनिर्मिती करून तालुक्याला पाणी व विज या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. याचा सुयोग विचार करून तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, तालुक्याचे आमदार राजेश पाटील व भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील या सर्वांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment