चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी, उद्योजक, तरुण आदींना उद्योग, व्यवसाय शिक्षणासाठी राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्ज पुरवठा केला जातो. तथापि चंदगड तालुक्यातील विविध राष्ट्रीयकृत बॅंक शाखांमधून अपवाद वगळता अशा लाभार्थ्यांची नाहक अडवणूक केली जाते. कर्ज मंजुरी अनेक महिने रखडवली जाते असे निदर्शनास आले आहे. याच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद र. कांबळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार कार्यालयासमोर दि. १५ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.
याची गंभीर दखल गडहिंग्लज उपविभागाचे तडफदार प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी घेत तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक बोलावली आहे. प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि २१ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चंदगड येथे बैठक होणार असून यावेळी बँक ऑफ इंडिया शाखा चंदगड, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोवाड, आय सी आय सी आय बँक शाखा चंदगड, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाड, तुर्केवाडी, अडकूर, तुडिये, बँक ऑफ बडोदा शाखा माणगाव, हलकर्णी, शिनोळी खुर्द, एचडीएफसी बँक शाखा चंदगड, युनियन बँक शाखा कुदनूर या सर्व बँकांच्या शाखा मॅनेजर यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. यावेळी बँक मॅनेजर यांनी स्वतः येणे अनिवार्य आहे प्रतिनिधी पाठवू नये. तसेच येताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन यावीत अशी सक्त ताकीद प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील विविध कामी लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणात होणाऱ्या अडवणुकीला आळा बसेल. गेल्या काही वर्षात विविध बँक खातेदारांचा महापुरात वाहून, पाण्यात बुडून, विजेच्या धक्क्याने तसेच रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना अपघाती विम्याच्या रकमा देण्यास अनेक बँका टाळाटाळ करत आहेत. ही गंभीर बाब असून याबाबतही प्रांताधिकारी बँकांची झाडझडती घेऊन ग्राहकांना न्याय देतील, असा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे उपस्थित राहणार आहेत. या धडक कारवाईबद्दल प्रांत अधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment