हिंदी भाषा सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी - प्रा. संजीवनी पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

हिंदी भाषा सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी - प्रा. संजीवनी पाटील

चंदगड येथील  र. भा. माडखोलकर महाविद्यालयात हिंदी दिन साजरा.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           "हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा असून ती अत्यंत  सुबोध आहे. हिंदी भाषा ही सामाजिक ऐक्य व देशाच्या अखंडतेस  टिकवून ठेवणारी आहे. या भाषेतील प्रचंड साहित्यामुळे भाषेला विश्व मान्यता प्राप्त झाली आहे. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा कालानुरूप  बदल करून आपल्या या समृद्ध भाषेची परंपरा. तिचा  वसा आणि ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवून भाषा  अधिक वृद्धिंगत करणे ही आपली जबाबदारी आहे."  असे प्रतिपादन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. 

          चंदगड येथील  र. भा. माडखोलकर महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे होते. यावेळी बोलताना प्रा. पाटील म्हणाले "ज्ञानार्जना साठी  ही एक सुलभ व समृद्ध अशी भाषा आहे. वैचारिक देवाणघेवाणीच्या कार्यात हिंदी भाषेचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी भाषेचे अध्ययन करून तिचा अधिकाधिक  प्रचार व प्रसार करण्यासाठी झटले पाहिजे." कार्यक्रमाचे  प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. एस. एन. पाटील यांनी  केले. प्रा. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी आभार मानले. विक्रम कांबळे याने मनोगत व्यक्त केले. इंदुताई कांबळे व सहकाऱ्यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचा प्रारंभ ईशस्तवनाने  झाला. कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे नेहरू युवा मंचचे  समन्वयक अमेय सबनीस, ओंकार सबनीस यांच्यासह  प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

No comments:

Post a Comment