किटवाड- कुदनूर नवीन रस्ता खचल्याने अपघातांची मालिका - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2022

किटवाड- कुदनूर नवीन रस्ता खचल्याने अपघातांची मालिका

यावर्षी नवीनच करण्यात आलेला रस्ता जागोजागी खचल्याने अशा प्रकारे धोकादायक बनला आहे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           किटवाड- कुदनूर हा चार किलोमीटर नवीन रस्ता पूर्वी रस्त्यात मारलेल्या चरींमुळे जागोजागी खचला आहे. नवीन रस्त्यात चालकाला दिसून न येणाऱ्या खचलेल्या भागामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. आज १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता उचगाव ( ता. बेळगाव) कडून होसूर, किटवाड मार्गे कुदनूर ला येणाऱ्या दुचाकी ला येथे अपघात झाला. दुचाकीवर मागे बसलेली महिला पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. 

    गेल्या काही वर्षांत किटवाड नजिक असलेली दोन धरणे व धबधबा पाहण्यासाठी बेळगाव, हत्तरगी, गडहिंग्लज, चंदगड परिसरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ सुरू आहे.  रस्ता नविन असल्यामुळे वाहने सुसाट असतात. पण नवख्या वाहन चालकांना रस्त्यात पडलेल्या चरींची माहिती नसल्याने अशा ठिकाणी नेमके अपघात होत आहेत. संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन अशा ठिकाणांची डागडुजी करून अपघात टाळावेत मागणी होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राजरोसपणे पाइपलाइन साठी चरी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment