कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
भारतात मान्सूनचा पाऊस संपण्याच्या काळात अर्थात परतीच्या पाऊस काळात सूर्याच्या हस्त नक्षत्र प्रवेशाबरोबरच हस्त नक्षत्राची सुरुवात होते. यंदा २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या काळात हस्त नक्षत्र आहे. या नक्षत्र काळात पडणारा पाऊस शेतीस उपयुक्त समजला जातो. यामुळे 'पडतील हस्त तर शेतकरी होईल मस्त.' अशी म्हण रूढ झाली आहे.
या काळात शेतकऱ्यांची बरीच पिके काढणीला आलेली असल्याने शेतकरीही खुशीत असतो. परतीच्या पाऊस काळात ढग मोठ्याने गडगडाट करू लागतात. यातून पडणाऱ्या पावसाला हस्ताचा किंवा हत्तीचा पाऊस म्हणतात. हस्त नक्षत्र काळातील १४-१५ दिवसांत हादगा हा खेळ खेळला जातो. हत्ती हे ढगांचे अर्थात जलतत्त्वाचे तर लक्ष्मी किंवा गौरी हे धरणीचे प्रतीक मानले आहे. म्हणून हत्ती च्या चित्राभोवती कुमारीका फेर धरून गायन व नृत्य करतात. विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली जाते. आणलेले पदार्थ एकत्र करून सर्वांना वाटले जातात. महाराष्ट्राच्या काही भागात हत्तीच्या चित्रा ऐवजी हादगा या वृक्षाची फांदी मधोमध रोवली जाते.
हादगा हा जमीन व पाणी यांच्या मिलनाचा म्हणजेच सुफलीकरणाचा विधी समजला जातो. एकंदरीत वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ बळीराजाला शेतातील पिकांच्या सुगीतून मिळत असते. त्याच्या पूर्वसंध्येवर येणारा हस्त नक्षत्रातील हादगा उत्सव शेतकऱ्यांच्या कुमारीका मुली आनंदाने नृत्य करून साजरा करतात. यावेळी पारंपरिक गीते गायली जातात हा उत्सव जुन्या परंपरेनुसार सुरू आहे, तो आधुनिकीकरणाच्या काळात टिकला पाहिजे. चंदगड तालुक्यात सर्वत्र हादगा पारंपरिक उत्साहात सुरू असून सध्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्येही हादग्याचा उत्साह दिसत आहे.
भोंडला, भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे. महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळतात. मुलींचे पावसाळ्यातील समूह नृत्य असेही या खेळाला संबोधले जाते.
No comments:
Post a Comment