चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कारला बनावट नंबर प्लेट लावून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव कारला चंदगड पोलिसांनी पकडले. ही कारवाई बेळगाव- वेंगुर्ले महामार्गावरील बेळेभाट गावानजीक केली. पाठलाग करणारी पोलिसांची गाडी पाहून आपली कार रस्त्याकडेला थांबवून घटनेतील आरोपी फरार झाले. गाडी सह 18 लाख 66 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी गाडीचे चालक व मालक यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत चंदगड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, ``गुन्ह्यातील वाहन पांढऱ्या रंगाची टाटा मोटर्स कंपनीची हेक्सा कारच्या पुढील व मागील नंबर प्लेट बदलून गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या तीन लाख 66 हजार 300 रुपये किमतीच्या सीलबंद दारूच्या बाटल्या महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने घेऊन चालले होते. वेंगुर्ला ते बेळगाव मार्गावर कानूर खुर्द ते बेळघाट गावांच्या दरम्यान या कारचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी हे वाहन पकडले. कानूर खुर्द येथे या वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला. तथापि आरोपींनी आपले वाहन बेळगावच्या दिशेने भरधाव वेगात सोडले. याचा पाठलाग करत असताना अखेर बेळेभाट गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला वाहन थांबवून आरोपी आपली ओळख लपवण्याच्या उद्देशाने फरार झाले.
या कारवाईत कारमधील मेंशन हाऊस फ्रेंच ब्रँडी, रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्की, मॅकडॉल नंबर वन लक्झरी व्हिस्की, ओरिजिनल ब्लेंडेड व्हिस्की, डॉ डॅन थ्री एक्स रम आधी कंपनीच्या विविध आकाराच्या काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या यांची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत 3 लाख 66 हजार 300 रुपये व पांढऱ्या रंगाची हेक्सा कार किंमत 15 लाख असा एकूण 18 लाख 66 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर नावलगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (4), 336 (2), 3 (5) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई), 90, 108, 83 सह मोटार वाहन कायदा कलम 239, 177, 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे स्वतः करत आहेत.
No comments:
Post a Comment