फाटकवाडी, झांबरे, पाठोपाठ 'जंगमहट्टी' ओव्हर फ्लो, 'चंदगड' मधील तिन्ही मुख्य धरणे जून मध्येच तुडुंब, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

01 July 2025

फाटकवाडी, झांबरे, पाठोपाठ 'जंगमहट्टी' ओव्हर फ्लो, 'चंदगड' मधील तिन्ही मुख्य धरणे जून मध्येच तुडुंब, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील प्रकल्प ओव्हर फ्लो, जंगमहट्टी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन वाहणारे पाणी

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तिन्ही मध्यम पाटबंधारे प्रकल्प जून अखेर ओव्हर फ्लो झाले.  घटप्रभा नदीवरील फाटकवाडी व ताम्रपर्णी नदीवरील झांबरे उमगाव या दोन प्रकल्पां पाठोपाठ जंगमहट्टी मध्यम प्रकल्प इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यातच ओसंडून वाहू लागले आहेत. 

      यंदा २० मे पासूनच मान्सूनपूर्व व त्याच्यासोबतच मान्सून ने दमदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यात पाणीच पाणी झाले आहे. परिणामी तिन्ही मध्यम प्रकल्प जून महिन्यातच ओव्हर फ्लो झाले. तिन्ही धरणांपैकी दरवर्षी जुलै महिन्याच्या मध्यावर भरणारा ४४.१७२ दशलक्ष घन मीटर क्षमतेचा घटप्रभा नदीवरील फाटकवाडी प्रकल्प यंदा १७ जून रोजीच ओव्हरफ्लो झाला.  दुसरा ताम्रपर्णी नदीवरील २३.२३ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा झांबरे प्रकल्प २४ जून २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने भरला. तर तिसरा जंगमहट्टी येथील ३३.६५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा प्रकल्प काल ३० जूनच्या मध्यरात्री भरला. यापूर्वी हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात भरायचा. यंदा १७ जून रोजी  या प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा होता. उर्वरित ६० टक्के पाणी १३ दिवसात भरले.

       हे तीन मध्यम प्रकल्प वगळता शिवसेना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात तालुक्यात कृष्णा खोरे योजनेतून बांधण्यात आलेले जवळपास १८ व इतर असे २३ लघुपाटबंधारे तलावही भरण्याच्या मार्गावर आहेत. महत्त्वाचे तिन्ही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता गृहीत धरून पाटबंधारे विभाग व प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असली तरी पावसाचे प्रमाण वाढल्यास महापुराची कुशंका तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना सतावत आहे.

No comments:

Post a Comment