कालकुंद्री- कोवाड दरम्यान ताम्रपर्णी नदीपात्रात मोडकळीस येऊन बंद अवस्थेत पडलेली नाव/ होडी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीमध्ये असलेली नाव वर्षभरापासून नादुरुस्त असल्याने बंद पडली आहे. परिणामी नागरिकांची कुचंबना होत आहे. नदी मार्गे कालकुंद्री ते कोवाड हे अंतर केवळ १ किमी असल्याने बरेच ग्रामस्थ व शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीस्कर होता. तसेच कालकुंद्रीतील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती नदीपलीकडे आहे. शेती कामे तसेच बाजारहाट व इतर कामांसाठी नदीतून पलीकडे जाण्यासाठी शेकडो वर्षांपासून पूर्वजांनी नावेची (डोण) व्यवस्था होती. त्यासाठी गावात बलुतेदारीवर डोणकरी कुटुंब ठेवण्यात आले आहे. तथापि गेल्या काही वर्षात भागात पूल रस्ते व वाहनांची संख्या वाढल्याने नावेकडे दुर्लक्ष झाले आहे. नाव बंद पडल्याने याचा फटका गरीब विद्यार्थी व शेतकऱ्यांना बसला आहे. १ किमी अंतरासाठी त्यांना कागणी मार्गे ६ किमी ची पायपीट करावी लागत आहे. याप्रश्नी कालकुंद्री ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी नुकतीच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे समजते.
गेल्या २० वर्षांत नदीत साकव, पूल, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणार अशा प्रकारच्या चर्चांना अधूनमधून उधान येत असते. २०-२२ वर्षांपूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत नदीकाठावर साकव बांधकामाचे भूमिपूजनही संपन्न झाले होते. तथापि याचे पुढे काय झाले? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. त्यानंतरही अनेक वेळा कोवाड- कालकुंद्री- किटवाड ते बेळगाव रस्ता होणार अशा प्रकारच्या हालचाली सुरू होत्या. हा रस्ता झाल्यास कोवाड ते बेळगाव हे अंतर सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही रस्त्यापेक्षा कमी होणार आहे. यासाठी तिन्ही गावच्या शेतकऱ्यांनी रस्त्यात जाणाऱ्या आपल्या जमिनी विना मोबदला देण्याची स्टॅम्प पेपरवर लेखी हमी बांधकाम विभागाकडे सादर केली होती. तरीही या रस्त्याबाबतच्या कोणत्याच हालचाली दृष्टिपथात नाहीत. उलटपक्षी नवीन रस्ता व नव्या पुलाच्या आशेवर बसलेल्या नागरिकांच्या नशिबी हक्काची गावचे वैशिष्ट्य असलेली नाव सुद्धा बंद पडल्याने निराशा आली आहे. यामुळे 'डोनात बसोन नदी पयल्याड जातली मज्जा' इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.
No comments:
Post a Comment