समाजाला भरकटवणाऱ्या टीव्ही सिरीयल पासून दूर राहा...! - अखलाक मुजावर - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

समाजाला भरकटवणाऱ्या टीव्ही सिरीयल पासून दूर राहा...! - अखलाक मुजावर

तेऊरवाडी येथे रौप्यमहोत्सवी नवरात्रौत्सवा निमित्त व्याख्यान प्रसंगी अखलाक मुजावर व मान्यवरांसमवेत मंडळाचे पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     कौटुंबिक भांडणांचे प्रशिक्षण देणाऱ्या टीव्हीवरील टुकार मालिकांना आजकाल प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो हे दुर्दैव आहे. अशा समाज भरकटवणाऱ्या व बिघडवणाऱ्या सिरीयल पासून महिलांसह सर्वांनीच दूर राहावे. असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते अखलाकभाई मुजावर (महागाव) यांनी केले. ते तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे रौप्य महोत्सवी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अशोक जोतिबा पाटील (मुंबई) हे होते.

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे सचिव नरसू पाटील यांनी केले. यावेळी पुढे बोलताना आखलाक मुजावर म्हणाले हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी धर्माधर्मात भांडणे लावण्याचे उद्योग राजकारणी लोक करत आहेत. याला अजिबात बळी पडू नका. शुद्ध आचरण हाच खरा धर्म आहे. आपले आचरण शुद्ध असेल तर धर्माची गरजच काय? असा सवाल त्यांनी केला. 

          महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आवाहन करताना ते म्हणाले, ``मोबाईल मनोरंजनातून विकृती निर्माण होता कामा नये. आपल्यासाठी आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे. त्यांची मान खाली जाईल असे कृत्य करू नका. मुलगाच झाला पाहिजे ही मानसिकता समाज विघातक असून मुली व महिला यांचा आदर प्रत्येकाने ठेवला पाहिजे. असे सांगताना त्यांनी मुलीच्या जन्माचा पुरस्कार केला. छत्रपती शिवराय, शंभूराजे यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श महिलांनी घ्यावा. १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे दिवस स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांनी रक्ताचा अभिषेक घालून मिळवले आहेत. त्या दिवशी जिलेबी खाण्यापेक्षा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक दिवस उपवास पाळून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करा. 

          भवानी तलवार लोखंडाची होती पण लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार होऊ शकत नाही. कारण त्या तलवारीची मूठ शिवरायांच्या हातात होती म्हणून ती तलवार भवानी होऊ शकली. अशा शब्दात त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कोवाड केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी आपले विचार मांडले. त्यांचा 'शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार' मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

          यावेळी कालकुंद्री तंटामुक्त कमिटी अध्यक्ष माजी सैनिक शंकर कोले, माजी सैनिक लक्ष्मण भिंगुडे, निवृत्त पोलिस हवालदार जनार्दन पाटील यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. व्ही. पाटील यांनी केले. आभार बी. एम. पाटील यांनी मांनले.

No comments:

Post a Comment