राष्ट्रीय जंतनाशक दिनी ७७०० मुलांना गोळ्या, कोवाड आरोग्य केंद्रात मोहीम यशस्वी - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2022

राष्ट्रीय जंतनाशक दिनी ७७०० मुलांना गोळ्या, कोवाड आरोग्य केंद्रात मोहीम यशस्वी

केंद्र शाळा कोवाड येथे राष्ट्रीय जंत निर्मूलन मोहीम कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

           प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड (ता. चंदगड) अंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ७७०० मुलांना जंतनाशक गोळ्या देऊन मोहीम यशस्वी केली. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. मुले जंतमुक्त व सशक्त बनवण्यासाठी जंतांचा प्रादुर्भाव थांबवणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना जंत नाशक गोळ्या दिल्या जातात. कोवाड आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ४० गावांतील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक अशा एकूण ५४ शाळांतील ८१४१ लाभार्थीपैकी ९५ टक्के विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या. उर्वरित लाभार्थ्यांना १७ ऑक्टोबर या मॉप अप दिनी गोळ्या देण्यात येणार आहेत.

          कोवाड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ च्या १६६ विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्य सहायिका सुनीता नाईक, आरोग्य सेविका संजीवनी पाटील, आशा स्वयंसेविका नंदिनी पाटील यांनी गोळ्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्रीकांत व्ही. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ दस्तगीर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक नारायण घोडे, उस्मान साबखान, औषध विभाग अधिकारी भरत पाटील, आरोग्य सेवक शैलेश वाघमारे, संभाजी अगोशे, आरोग्य सेविका सुनिता नाईक, सुधा निर्मळकर, हेमलता गावित, किशोरी कागणकर, रेणुका कांबळे, मंगल तरवाळ, निर्मला पाटील, प्रतिभा पाटील, संजीवनी पाटील, सुजाता कांबळे आदींनी उत्कृष्ट नियोजनबद्ध परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment