![]() |
संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हत्ती आणि मानव संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. जंगली हत्तींनी आपला मोर्चा आता गावांकडे वळवल्यामुळे गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. उमगाव (ता. चंदगड) परिसरातील शेतामध्ये सकाळी व सायंकाळच्या वेळी हत्तींचा वावर वाढल्यामुळे पिकांच्या रखवालीसाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
सकाळी व सायंकाळच्या वेळी हत्तींच्या भीतीमुळे लोक पिके राम भरोसे सोडून घरीच थांबत आहेत. त्यामुळे हत्तींच्या कळपाकडून हातातोंडाशी आलेली पिके जमीन दोस्त केली जात आहेत. हत्तींच्या कळपाकडून पिके खाण्यापेक्षा हत्ती शेतातून गेल्यामुळे संपूर्ण पीक तुडवल्याने मोठे नुकसान होत आहे. वारंवार वन विभागाला कळवूनही वन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. पंचनामा करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करताना व संपुर्ण प्रक्रिया पुर्ण होईपर्यत शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.
उमगाव पासून जवळच असलेल्या सावतवाडी, धुरीवाडी, खळणेकरवाडी व झांबरे परिसरात या हत्तींच्या कळपाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत व सायंकाळी सहानंतर हत्तींचा कळप मानवी वस्तीकडे येत आहे. त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे सोडून दिले आहे. पिकांच्या रखवालीसाठी कोणी नसल्याने हत्तींच्या बरोबर अन्य जंगली प्राण्यांकडून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार मागणी करूनही वन विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
उमगाव येथील गुंडू चंनाप्पा गावडे, गोविंद निंगोजी धुरी, शंकर महादेव गावडे, गोविंद कृष्णा सावंत, दत्तु बाळा सावंत, अर्जून सावंत यांच्यासह या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती व अन्य जंगली प्राण्यांच्याकडून नुकसान झाले आहे. हत्ती व अन्य जंगली प्राण्याकडून होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकरी वर्गाला करावा लागणारा खटाटोप शेतकऱ्यांच्या नाकात दम आणणारा आहे.
त्यामुळे वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर ठोस योजना करून हत्तींचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. वनविभाग कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलो
काल रात्री उमगाव येथील गोपाळ दत्तू गावडे हे मठ नावाच्या शेताकडे रखवालीसाठी गेले होतो. अचानाक रात्रीच्या वेळी हत्तीचा कळप त्यांच्या शेतामध्ये आला. श्री गावडे यांची चाहूल लागतात हत्ती गावडे यांच्या दिशेने पाठलाग करू लागल्याने गावडे हे गावच्या दिशेने पळत सुटले. कसाबसा त्यांनी आपला जीव वाचवला.
No comments:
Post a Comment