'सारथी' च्या योजना 'मराठा सेवा संघ' तळागाळापर्यंत पोहोचवणार...! -प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे, कोल्हापूर येथे पश्चिम विभागीय आढावा बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2022

'सारथी' च्या योजना 'मराठा सेवा संघ' तळागाळापर्यंत पोहोचवणार...! -प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे, कोल्हापूर येथे पश्चिम विभागीय आढावा बैठक

मराठा सेवा संघाच्या कोल्हापूर येथील विभागीय आढावा बैठकीची सुरवात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी उपस्थित पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            मराठा समाजाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाची 'सारथी' योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ कसा मिळवावा याची माहिती मराठा सेवा संघ व त्याचे ३३ कक्ष तळागाळापर्यंत पोहोचवेल असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांनी केले. ते कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा सेवा संघ व संघ प्रणित ३३ कक्षांच्या पदाधिकारी विभागीय आढावा बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

            प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केले. स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष विनायक पाटील यांनी केले यावेळी पुढे बोलताना घोगरे यांनी समाजासाठी अधिक वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे, मराठा समाजात सलोखा नांदावा यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत याबरोबरच मराठा सेवा संघ प्रणित सर्व कक्षांच्या नवीन पदाधिकारी निवडीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने झाली. एस आर पाटील यांच्या हस्ते  जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची शासकीय मुद्रीत गाथा देऊन प्रदेशाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंचावर विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, सांगली जिल्हा सचिव अमृत सुर्यवंशी, भास्कर पाटील, शहाजी पाटील, सातारा चे युवराज पाटील, सोमेश्वर जरे, सोलापूर चे दादासो पवार, शिवाजी लोंढे-पाटील, उद्योग कक्षाचे संजय काटकर, मधूकर बिरंजे उपस्थित होते. विभागीय उपाध्यक्ष अश्विन वागळे यांनी कोरोनाच्या गंभीर काळात संघटनेच्या वतीने केलेल्या कामाची माहिती दिली.

      बैठकीस उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर,  एस एन पाटील,  अशोकराव खाडे, जिल्हा संघटक सुशांत निकम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, राजाराम देसाई, अजय भोसले, मधूकर बिरंजे  अभिजीत पवार, गणपती अडसूळ आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन जिल्हा प्रवक्ते शहाजी देसाई यांनी केले. आभार जिल्हा संघटक सुशांत निकम यांनी मानले.

No comments:

Post a Comment