शिक्षकांनी मुलांच्या भावविश्वाला समजून घ्यावे : राजेंद्र पाटील, संजय साबळे यांच्या ' बाबांना समजून घेताना ' पुस्तकाचे कोल्हापूरात प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2022

शिक्षकांनी मुलांच्या भावविश्वाला समजून घ्यावे : राजेंद्र पाटील, संजय साबळे यांच्या ' बाबांना समजून घेताना ' पुस्तकाचे कोल्हापूरात प्रकाशन


कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

         "मराठी साहित्यात आई विषयी भरभरून लिहलं गेलं. त्यामानाने आपल्या व्यक्तीमत्वाचा आधार असलेला  बाप मात्र दुर्लक्षित राहिला. शालेय मुलांच्या मनात बाबांना काय स्थान आहे, मुलं आपल्या बाबांविषयी काय विचार करतात हे मुलांनी मनापासून लिहिले आहे.बालमनाचा आरसा म्हणजे 'बाबांना समजून घेताना' हे पुस्तक होय. शिक्षक, पालक व बाल मानसशास्त्रासाठी  हे पुस्तक संदर्भाचा खजिना ठरेल." असे प्रतिपादन राजेंद्र पाटील यांनी केले. ते संजय साबळे यांच्या 'बाबांना समजून घेताना' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

       कळंबा गल्स हायस्कूल कोल्हापूर  येथे मराठी अध्यापक संघाच्या कार्यशाळेत  पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य बी. एस. कांबळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव शिवणगेकर यांनी केले.

      "मुलांच्या भावना समजून घेणं, त्याची सामाजिक, कौदुंबिक परिस्थिती समजून घेणं प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे. मुलांच्या अंतरंगात शिरून त्यांना लिहित केल्यास ती मनमोकळेपणाने व्यक्त होतात. आपल्या बाबांविषयी कटू - गोड अनुभव बाबांना समजून घेताना या पुस्तकात मुलांनी मांडले आहेत. अशा उपक्रमातून मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणे हा उद्देश आहे. " असे मत संजय साबळे यांनी मांडले.

        कार्यक्रमाला अरूण कुंभार, अन्वर पटेल, शशिकांत बैलकर, सोनल गाडेकर, राहूल टिपूगडे, जी. आर. कांबळे, एच. आर. पाऊसकर, एस. पी. इनामदार, एस. के. मोहणगेकर, अशोक बुकटे, विजय सरगर, नेताजी डोंगळे, अशोक पवार, निशा साळोखे, सुलोचना कोळी, सूरज पाटील, रवि पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन यादव यांनी तर आभार  पी. डी. पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment