अध्यक्षांचे मनोगत - चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ अध्यक्ष - भिमसेन लक्ष्मणराव राजहंस - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2022

अध्यक्षांचे मनोगत - चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ अध्यक्ष - भिमसेन लक्ष्मणराव राजहंस

भिमसेन लक्ष्मणराव राजहंस


          चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ, चंदगड यांच्या वतीने फलक उद्घाटन व गुणवंताचा सत्कार कार्यक्रम १ जानेवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्या निमित्त या संस्थेचे कायदेशीर सल्लागार भिमसेन लक्ष्मणराव राजहंस यांचे मनोगत...........

          आजची सामाजिक परिस्थिती पाहिली तर  बिकट झालेली आहे. समाजामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून कोणीही आपले कार्य करत नाही. नातेसंबंधात प्रेम राहिलेले नाही. प्रामाणिकपणा लोक विसरत चाललेले आहेत. समाज अधोगतीच्या वाटेने चालला आहे.  आई -वडील व मुलांचे नाते राहिलेले नाही. जुन्या जाणत्या आई-वडिलांची वाटचाल वृद्धाश्रमाच्या दिशेने तीव्र गतीने होत आहे. यावर कोणाचेही बंधन राहिलेले नाही. मुला-मुलींचा ओघ विदेशी संस्कृतीकडे आकर्षिला जात आहे. त्यातच कोणाचेही बंधन कोणावरही राहिलेले नाही. त्यामुळे बिघडलेल्या सर्व गोष्टीवर बंधन कोणी घालायचे? बंधन घालायचा अधिकार कोणाचा? लहान थोर हा भेद नवीन पिढीत राहिलेला नाही.  

मंडळाच्या वतीने जटा निर्मुलन.

             जुनी संस्कृती लयाला जाऊन नवीन संस्कृती तयार होत आहे. आधुनिक पिढीवर परदेशी संस्कृतीचा पगडा पडत आहे. यावर शासन काय उपाय करेल काय? लग्न, नामकरण सोहळा बदललेला आहे. हे संस्कार नवीन स्वरूप घेत आहेत. लग्न हा संस्कार फार बदललेला आहे. लग्न ठरविणे थोरामोठ्यांच्या विचाराने चालायचे. पण आता ती स्थिती राहिलेली नाही. मुले-मुली एकमेकांना पाहून स्वत:च लग्न ठरवितात. व्हाट्सअपवर पाहून दोघांच्या प्रेमाच्या वेडात लग्ने ठरतात आणि तशीच मोडतात आणि घटस्फोट घेतले जातात. त्यांना दिवसांचे बंधन होऊ दे, काळ कितीही होऊन जाऊ दे, दोघांचा भांडण तंटा होऊन भांडणात विवाह बंधने तुटतात. आज विवाह होतो, उद्या विवाह तुटतो आणि कोर्टात सोड पत्रासाठी खेटा घालतात.  

       शेवटी चार ते सहा महिन्यात कोर्टात सोडपत्र होते. काही केसेस बराच कालावधी लावतात. शेवटी कंटाळून आत्महत्या करतात. असा सगळा खेळ- खंडोबा झालेला आहे. काही जोडपी सोडपत्र घेण्यासाठी येतात व येतानाच दुसरा प्रेमिक अथवा प्रेमिका यांना बरोबरच घेऊन येतात आणि दुसऱ्यांदा प्रेम बंधनात पडतात व पुन्हा प्रेम विवाह होतो. हे सर्व पाहिल्यानंतर असे वाटते की यांना आवरणार कोण? कसे? समाजामध्ये अनेक गोष्टी बिघडत चाललेल्या आहेत. मुलगा बापाचे ऐकत नाही. बाप मुलाचे ऐकत नाही. मुलाचे व बापाचे नाते संबंध बिघडून जातात.एकदा लग्न झाले की मुलगा पत्नीचे ऐकतो व त्या विचाराने आई-वडिलांचे हाल होत जातात. त्यामुळे वयोवृद्ध आई वडील वृद्धाश्रमामध्ये जात आहेत. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. सोडपत्रांची संख्या वाढत आहे. हुंडा देणे कायद्याने गुन्हा असून सुद्धा हुंडाबळींची संख्या वाढत आहे. 

देवदासीच्या जटा काढीत असताना. 

          भाऊ व बहीण यांचे नातेसंबंध बिघडत आहे. याला कारण म्हणजे वारसा हक्क भावाने बहिणीला जर नाकारला तर कोर्टकचेऱ्यांना सुरुवात होते आणि भाऊ बहीण भावांचे नाते कायमचे तुटते. भावाचे नाते संबंधी या विषयावरून तक्रारी करता कोर्टात जातात. त्यांचेही नातेसंबंध तुटतात. हे सर्व कशाचे परिणाम आहेत? हे सर्व परिणाम समाज परिवर्तनाचा भाग आहे.  हा कलियुगातील कलीचा परिणाम आहे. याच्यावर कोण काय उपाय करू शकेल? शासनाने यावर परिणामकारक उपाय शोधावेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार करून आम्ही एका कार्यक्रमांमध्ये ठराविक लोक एकत्र आलो आणि यातील काही गोष्टीवर थोडा चांगला विचार केला. प्रत्येक गोष्टीवर तक्रार, भाऊबंदकी, बहीण भाऊ संघर्ष, विवाहित जोडप्यातील वाद, जमीन जुमला, स्थावर  मिळकती, प्रत्येक गोष्टी तक्रार, कोर्टकचेऱ्या यामध्ये लोकांचा वेळ व पैसा भरमसाठ खर्च होऊन निर्णय मनासारखा लागत नाही. कोर्टातील केसीस, दहा वीस वर्षे, हयात भर खेट्या घालण्यात, वकील फी, प्रवास खर्च यांच्या मुळे जीवन विस्कळीत होते. 

           कर्जबाजारी होणे आणि त्यामुळे जीवन संपविणे याच्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही येथील  चंद्रसेन गल्ली येथील प्रमिला गायकवाड यांच्या शिवण क्लासच्या कार्यक्रमांमध्ये विचार मंथनातून असे एक मंडळ स्थापन करूया असे ठरवले. यामध्ये  धोंडीबा सावंत, दत्ता देशमुख व मी स्वतः भीमसेन राजहंस, गायकवाड, हणमंत मेढे, नरसू पाटील या सर्वांनी  मंडळ स्थापन करूया असा विचार केला. याला आमचे भाऊ अॅड. अर्जुनराव लक्ष्मणराव राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळ, तालुका चंदगड स्थापन केले. पण कायदेशीर  सल्लागार म्हणून त्यांचे मार्गदर्शन लाभले. दिनांक 13 /6 /2014 रोजी मंडळ रजिस्ट्रेशन करून कार्य सुरू केले. गेली आठ वर्षे हे मंडळ कार्यरत आहे. मंडळाचे कार्य जोमाने सुरू आहे. समाजामध्ये अनेक तक्रारी वाढत्या प्रमाणात आहेत. 

           सोडपत्र, हुंडाबंदी असताना गुप्तपणे हुंडा मागितला जातो आणि  त्याची पूर्तता मुलीचा बाप करतो पण नवरदेवाकडील मंडळींची  इच्छापूर्ती होत नाही. अपेक्षा वाढत जातात व शेवटी त्या नवरी मुलीला मानसिक, शारीरिक छळ सोसावा लागतो. अशा अनेक तक्रारी समाजामध्ये वाढलेल्या आहेत. कोर्टात केसेस प्रलंबित आहेत. विनाकारण पैसा खर्च होतो. कोर्ट खर्च, वकील फी, प्रवास खर्च यांच्यात आई वडील ग्रासले आहेत. कधीकधी त्या तक्रारी मिटत नाहीत. आई-वडील, मुलगी त्रासून आत्महत्या करतात. हा समाजाला लागलेला कलंक आहे. त्यातच महागाई आ वासून बसलेली आहे. त्याकरिता आमचे मंडळ समझोता, सोडपत्र करून देते. तेही त्रोटक प्रवेश फी घेऊन! दोघांना समोर घेऊन तक्रार मिटवली जाते. 

           ना मध्यस्थ, कोणी खो घालणारा मनुष्य नाही. ना वकील फी, ना दुसरा कोणता खर्च किंवा कोणतेही राजकारण नाही. सत्यता पडताळून पाहून निर्णय दिला जातो. तो ही विना विलंब! म्हणून या मंडळाचा सर्व समाजाने, तालुक्याने, राज्याने फायदा घ्यावा व आपले स्वहित समजून विना खर्च, विना विलंब, निष्कलंक व विना राजकारण समस्या सोडवून  घ्यावी.  तसेच भाऊबंदकी, जमिनीची प्रकरणे, शेती, मालमत्ता व कोणत्याही तक्रारी या मंडळामार्फत सोडविल्या जातात. त्याचा सर्वांनी मागास, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती, आदिवासी लोकांनी दुसऱ्या कोणाच्याही सांगण्यावरून कोर्टकचेरी, पोलीस केस, मारामारी, तंटेबखेडे करून विनाकारण त्रास करून घेऊ नये. वेळ फुकट घालवू नये. आजचे युग हे आधुनिक युग, धावते युग आहे. तेव्हा सर्वांनी अधिक खर्च ,अधिक वेळ न दवडता या मंडळाचा फायदा घेऊन आपली कामे करून घ्यावी. 

          चंदगड तालुका हा विस्ताराने मोठा आहे. राज्याच्या राजधानी पासून लांब गोवा बॉर्डर तसेच कर्नाटक बॉर्डर आहे. त्यामुळे तालुक्याची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये  जुन्या रूढी पाळल्या जातात. लोक अंधश्रद्धेला बळी पडले आहेत आणि उच्च शिक्षण, प्रगत शिक्षण घेणे गोरगरीब लोकांना कठीण जाते. त्यामुळे बरेच विद्यार्थी उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षणापासून वंचित आहेत. वंचित राहतात .त्यामुळे कोणत्याही शिक्षणासाठी त्यांना अतिकष्ट घ्यावे लागतात. 

          त्यातच जातीभेद हे मोठे संकट आहे. भेद निर्मूलनाचा विचार फक्त स्टेजवर बोलला जातो. पण प्रत्यक्षात कृतीत येत नाही .कृतीत कुणीही आणत नाहीत, हे मोठे दुर्देव आहे. या संकटाला मोडून काढण्यासाठी शासनाला कठोर कायदा करावा लागेल तरच हा भेद समूळ नष्ट होईल. यासाठी आमचे मंडळ जटा  निर्मूलन ,अंधश्रद्धा मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे .आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. सामुदायिक विवाह ,आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहे. तालुका विस्ताराने मोठा आहे म्हणून स्त्रीशक्तीला वाव देऊन सामुदायिक शेती करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. शेती आणि महिला यांच्यात समन्वय साधणे,  शेतकऱ्यांना अल्प बचतीसाठी प्रवृत्त करणे यासाठी अधिक प्रयत्न चालू आहे. 

          विस्तार जास्त असल्यामुळे कृषी प्रक्रिया संस्था काढून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा आमचा मानस आहे.  स्त्री प्रतिष्ठा वाढविणे, स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी वरचेवर प्रबोधन पर व्याख्याने घेऊन प्रयत्न करणे, वृक्षारोपण करणे वृक्षतोडबंदी ,पर्यावरण जागृती करणे, अन्याय निवारण समिती स्थापन करून अन्यायग्रस्त व्यक्तीला संरक्षण मिळवून देणे,  शेतकऱ्यांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवणे, ग्रामीण व शहरी भागातील मुला मुलींसाठी प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महिला विद्यालय, विद्यापीठ स्तरावर शिक्षण या सह तांत्रिक ,अभियांत्रिकी ,संगणक ,औद्योगिक ,कला ,विज्ञान आणि वाणिज्य ,विज्ञान ,कृषी शिक्षण संस्था ,शासन कृषी शिक्षण शास्त्र ,फार्मसी, नर्सिंग ,व्यवस्थापकीय, पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन ,पर्यावरण, संगीत ,नृत्य विभागाचे मराठी ,हिंदी ,इंग्रजी आवश्यक त्या भाषेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे.

            तसेच संगणक शिक्षणाचे विविध कोर्सेस ,संगणक लँग्वेज वर्ग चालू करणे, संगणक क्षेत्रामध्ये संशोधन करून गरजू विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सुविधा पुरविणे ,सॉफ्टवेअर कोर्सेस सुरू करणे, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय ,अल्पसंख्यांक ,आदिवासी ,भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे, शिक्षण क्षेत्रातील विषमता दूर करणे, बी.ए.एम.एस . डेंटल कॉलेज,   डी.एम.एल.टी., बी .टेक .,एम., टेक. लॉ कॉलेज हे सर्व प्रयत्न करून सर्वांगीण विकास करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केलेली आहे. या प्रयत्नांना आमच्या मंडळाला पत्रकारांनी अधिक सहकार्य केल्यास आमच्या वरील कामाला अधिक गती मिळेल अशी आशा आहे .आमचे मंडळ हे निस्वार्थी कार्य करत आहे .आमचे सर्व सदस्य पदरमोड करून काम करत आहेत. कोणत्याही आमिषाची अपेक्षा नसताना विना राजकरण निकाल दिला जातो.

        लोकांना आमच्या मंडळामार्फत योग्य निकाल विना राजकारण, विनाविलंब व विना खर्चिक होतो म्हणून आमच्या मंडळामार्फत तक्रारी निवारण करून घ्याव्यात अशी विनंती. समाजामध्ये जर का एकोपा घडविण्याचा असेल तर सामंजस्याने लोकांना पटवून देऊन त्यांचे म्हणणे योग्य तऱ्हेने ऐकून घेऊन दोन्ही पार्ट्यांचे समाधान करून निकाल द्यावा लागेल .ते फक्त आमच्या मंडळाच्या कार्यामध्ये घडते आहे .कोर्टातील ज्या तक्रारीअसतील त्या आमच्या मार्फत सोडवून  घ्याव्यात. 

           आम्ही मंडळामार्फत शासनाकडे अशी मागणी करणार आहोत की, समाजात सोडपत्र व इतर तक्रारी सोडवण्यासाठी कायदेशीर आमच्या मंडळाला परवानगी द्यावी. म्हणजे अधिक सोयी होऊन लोक त्याचा फायदा घेतील. समाजामधे सामंजस्याचे वातावरण निर्माण होईल. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. मी मंडळाचा अध्यक्ष या नात्याने  प्रयत्न करत आहे. तसे झाले तर प्रत्येक गावात तंटामुक्ती मध्ये आम्ही सहभागी होऊन तक्रारी निवारण करण्याचा प्रयत्न करत राहू.आमच्या मंडळाची वाटचाल त्या दृष्टीने चालू आहे.(लेखात आलेले मत हे त्या व्यक्तीचे वैयक्तिक मत आहे. त्याच्याशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही)


No comments:

Post a Comment