चंदगड तालुक्यात नवर्षारंभीच सॉ मिल, ऑइल मिल, फॅब्रिकेटर्स कारखान्यास भीषण आग...! लाखोंचे नुकसान, सुतार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर, कोठे घडली घटना........ - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2023

चंदगड तालुक्यात नवर्षारंभीच सॉ मिल, ऑइल मिल, फॅब्रिकेटर्स कारखान्यास भीषण आग...! लाखोंचे नुकसान, सुतार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर, कोठे घडली घटना........

कुदनुर येथे आगीत खाक झालेला कारखाना.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            नूतन वर्ष २०२३ च्या आरंभीच कुदनूर (ता. चंदगड) येथील शशिकांत शिवराम सुतार व बंधू यांच्या लाकूड कापण्याचे अरायंत्र (सिद्धेश्वर सॉ मिल), तेल गिरणी (सिद्धेश्वर ऑइल मिल) व शिवराम फॅब्रिकेटर्स या कारखान्यांना लागलेल्या भीषण आगीत अंदाजे सुमारे १ कोटींचे नुकसान झाले. या आगीत कारखान्यात बांधलेली दोन बकरी व  दोन मोटर सायकलही जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंडल अधिकारी शरद मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचानामा करुन १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

        ही घटना १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ४ वाजता घडली. शशिकांत सुतार, त्यांचे बंधू  गजानन सुतार, तुकाराम सुतार, दिलीप सुतार, जानबा सुतार कुटुंबीय गेली अनेक वर्षे कुदनुर येथे कालकुंद्री मार्गानजीक आरायंत्र चालवतात. गेल्या काही वर्षात त्यांनी याच कारखान्यालगत तेल गिरणी व फॅब्रिकेटर्सचा मोठा व्यवसाय सुरू केला होता. या कारखान्याला अज्ञात कारणास्तव पहाटे भीषण आग लागली. त्यात तिन्ही कारखान्यांचे मिळून अंदाजे सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याने सुतार कुटुंबियांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. लाकूड व तेल साठ्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.  

          गडहिंग्लज नगर परिषदेचा अग्निशमक बंब येईपर्यंत तिन्ही कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडले होते. लाकूड व तेल गिरणीच्या साठ्यामुळे आग भीषण होती. यावेळी ग्रामस्थांनीही जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आत गॅस सिलेंडर असल्याचे समजल्यामुळे यावरही भीतीमुळे मर्यादा आल्या.  तिन्ही कारखान्यांची मशिनरी, विद्युत मीटरसह मोठा लाकूड साठा, तेल काढण्यासाठी आणलेल्या शेंगा व काढलेले तेल फॅब्रिकेटर्स व्यवसायासाठी आणलेल्या लोखंड, ट्रॅक्टर ट्रॉली व शेड इमारत आगीच्या भक्षस्थानी पडले. 

          गेल्या काही वर्षात सुतार बंधूनी येथे शिवराम ट्रॅक्टर ट्रॉली बनवण्याचा उद्योग  सुरू केला होता. त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आगीची सुरुवात पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी दाखवत असून त्यानंतर हा कॅमेराही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी तेथे दोन व्यक्तींचा वावर असल्याचे अस्पष्ट दिसते असे सुतार बंधू यांनी सांगितले. घटनेच्या रीतसर पंचनामा सकाळी १० पर्यंत झालेला नव्हता.          

         एकंदरीत नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सकाळपासून घटनास्थळी कुदनूर परिसरातील हजारो नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. घटनास्थळी माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील तसेच अन्य राजकीय व्यक्तींनी भेट देऊन पाहणी केली.

                                    

No comments:

Post a Comment