नववर्ष संदेश : दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला सायकल चालवायचा संदेश, नववर्षाचा अभिनव उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2023

नववर्ष संदेश : दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला सायकल चालवायचा संदेश, नववर्षाचा अभिनव उपक्रम

पर्यावरण वाचवाचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी व पदाधिकारी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         'सायकल चालवा, आरोग्य टिकवा' झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा, इंधन वाचवा, क्लीन चंदगड, ग्रीन चंदगड' अशा घोषणा देत रसायकलीचं चंदगड रस्त्यावर अवतरलं. त्यातून प्रदुषणमुक्ती पर्यावरण संवर्धन चा नारा देत न्यू इंग्लिश स्कूल व माझी वसुंधरा ३.०  व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपंचायत चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली काढण्यात आली.

         नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्येकजण स्वतःसाठी वेगवेगळे संकल्प करत असतो. पण  विद्यार्थ्यांनी प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात, घेऊन काढलेली सायकल रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दि न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याद्यापक एन. डी. देवळे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. दि न्यू इंग्लिश स्कूलपासून सुरू झालेली रॅली संभाजी चौक, नगरपंचायत कार्यालय, रवळनाथ मंदिर, गांधीनगर, साईनगर, विनायक नगर, कोर्ट रोड ते ग्रामीण रूग्णालय येथे संपली.

         दरम्यान पर्यावरण पूरक घोषवाक्य देऊन लोकांपर्यंत पर्यावरण बद्दल जनजागृती देखील करण्यात आली. "उत्तम आरोग्यासाठी आणि प्रदुषण टाळण्यासाठी सायकल चा वापर होणे गरजेचे आहे.सायकलींचा पुन्हा वापर वाढून पर्यावरण संवर्धनात योगदान दयावे" असे आवाहन नगरसेवक अभिजीत गुरबे यांनी केले.

      "सायकल चालवल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामूळे सामाजिक आणि व्यक्तीगत स्वास्थ्य चांगले राहते. सायकलचा वापर रोज व्हावा यासाठी प्रसार -प्रचार होणे गरजेचे आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सायकल चालविण्याचा संकल्प सर्वानी करणे ही काळाची गरज बनली आह"'. असे प्रतिपातन नगरपंचायतीचे स्वच्छ ब्रँड अम्बेसिटर संजय साबळे यांनी केले.

          रॅलीमध्ये दि न्यू इंग्लिश स्कूलचे शेकडो विद्यार्थी, नगरसेवक अभिजीत गुरबे, सचिन नेसरीकर, विजय कडूकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल हुंबरवाडी, टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, दिपक पाटील, शरद हदगल, शहर समन्वयक राजेंद्र दळवी, देवेंद्र वोझा, अमेय सबनीस व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment