चंदगड येथे आचार्य जांभेकर जयंती व दर्पण दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2023

चंदगड येथे आचार्य जांभेकर जयंती व दर्पण दिन उत्साहात

चंदगड येथे आचार्य जांभेकर जयंती व दर्पण दिन प्रसंगी उपस्थित पत्रकार.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पन हे दैनिक सुरु केले. हा दिवसा दर्पन दिन म्हणून साजरा करण्यात येते. त्यामुळे आज पत्रकार संघाच्या वतीने हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केला. चंदगड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे होते. 

         प्रमुख पाहुणे म्हणून दोडामार्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष तुलसीदास नाईक तसेच युवा उद्योजक डाॅ. सुनिल काणेकर यांची उपस्थिती होती. स्वागत पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य अनिल धुपदाळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी या दिवशी  "दर्पण" हे नियतकालिक सुरू केले होते. तो दिवस पत्रकारांच्यासाठी "पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो. चंदगड तालुका पत्रकार संघाचे हे वर्ष रौप्यमहोत्सवी आहे. त्यामुळे पत्रकार दिनाच्या निमित्ताने, यावेळी वर्षभरात विविध प्रकारचे नियोजन केले जाणार आहे. पत्रकार संघाच्या वतीने चंदगड लाईव्ह (सी. एल. न्युज) सुरु केले आहे. त्याला चार वर्ष पूर्ण झाले आहे. देशासह जगातील नऊ देशात राहणारे भारतीय लोक सद्या यांचे वाचक  आहेत. चंदगड तालुका पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद या सर्वात जुन्या (ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या) संस्थेबरोबर संलग्न राहून काम करत आहे. या परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले असल्याचे सांगितले. 

     यावेळी पत्रकार तुलसीदास नाईक यानी सिंधुदुर्गातील (पोंभूर्ले) सुपूत्र असलेले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यानी भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा पाया आपल्या लेखनीने रचला. त्यांच्या लेखणीचा वारसा आज पत्रकाराकडून प्रामाणिकपणे जपला जात असल्याचे सांगितले. तर युवा उद्योजक सुनिल काणेकर यानी डिजिटल युगात पत्रकारिता करणे अवघड आहे. चंदगड तालुक्यातील पत्रकारांनी प्रतिकूल परिस्थितीत तुटपुंज्या मानधनावर पत्रकारिता करून वेगळा आदर्श घालून दिला आहे. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ गणले जातात. देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती जे करू शकत नाही ते काम पत्रकार करू शकतात. सामाजिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी पत्रकारांची लेखणी फार मोठे कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले. 

       यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस चेतन शेरेगार, चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी. एल. न्यूज चॅनेलचे संपत पाटील उपस्थित होते. आभार संस्थापक सदस्य उदयकुमार देशपांडे यानी मानले. यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे  सदस्य उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment