चंदगड तालुक्यातील कारखान्यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाची उचल करावी,स्वाभिमानाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2023

चंदगड तालुक्यातील कारखान्यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाची उचल करावी,स्वाभिमानाची मागणी

निवेदन देताना स्वाभिमानाचे कार्यकर्ते

चंदगड/प्रतिनिधी :-- 

चंदगड तालुक्यातील दौलत-अथर्व, हेमरस (ओलम) व इको केन या साखर कारखान्याने चंदगड तालुक्यातील ऊसाची उचल करावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

   चंदगड तालुक्यामध्ये असणारे तीनही ऊस कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून ते आपल्या ठरलेल्या उदिष्टनुसर ऊस गाळप करत आहेत. मात्र, अद्याप तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असून हा ऊस नेमका येतोय कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तरी याबाबत तहसील प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे. तालुक्यातील अथर्व (दौलत), ओलम शुगर व इकोकेन या कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांकडे उसही मुबलक प्रमाणात येत आहे. दरवर्षीचा अनुभव पाहता जानेवारी महिना सुरू होईपर्यंत तालुक्यातील पन्नास टक्के ऊसतोड झाली पाहिजे. असे असले तरी यावर्षी चंदगड तालुक्यात अनेक गावातील ऊस शेतामध्येच आहे. मग, कारखान्याकडे येणारा ऊस कोणाचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ही परिस्थिती पाहता तिन्ही कारखान्याच्या प्रशासनाची व प्रमुख शेतकऱ्यांची बैठक आयोजित करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी केली आहे.चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी ऊसाबाबत चिंता आहे. याबाबत अनेक वेळा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी निवेदनही दिले आहेत. तरीही कारखानदारांनी दखल घेतलेली नाही. तरी आता प्रशासनाने मंगळवार दि. १० जानेवारी २०२३ रोजी तहसील कार्यालयामध्ये बैठक घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. बैठकीचे आयोजन करावे अन्यथा गावागावातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढेल आणि शेतकरी कायदा हातात घेतील. तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर प्रा. दिपक पाटील, अजित पाटील, विरूपाक्ष कुंभार, अर्जुन मर्णहोळकर, पुंडलिक पाटील आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments:

Post a Comment