सेवा संस्थेचा अध्यक्ष ते महाराष्ट्राचा मंत्री, भरमूअण्णांची प्रेरणादायी वाटचाल - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2023

सेवा संस्थेचा अध्यक्ष ते महाराष्ट्राचा मंत्री, भरमूअण्णांची प्रेरणादायी वाटचाल

  

भरमूअण्णा पाटील

चंदगड / नंदकुमार ढेरे
विकासाची स्वप्ने घेऊन ती सत्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करणारा आणि चंदगड, आजऱ्याला विकासाच्या मार्गावर नेणारा पहिला नेता म्हणजे भरमूअण्णा सुबराव पाटील. बसर्गे (ता. चंदगड) गावचा सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कृषि सभापती, आमदार आणि मंत्री अशा यशाच्या पायऱ्या ओलांडणारे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा यांनी विकासाविषयक अनेक प्रश्न मार्गी लावले. आपल्या विभागातील विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन धोरण निश्चित केले. आमदार व मंत्री म्हणून कालावधी कमी पडला. त्यामुळेच अनेक प्रश्न उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत. आज मंगळवारी दि. १७ जानेवारी २०२३ रोजी अण्णा ८७ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. विशेष म्हणजे एखाद्या तरूणाला लाजवेल अशा पद्धतीने ते राजकारण आणि समाजकारणात कार्यरत असून त्यांचे या वयातही सुरू असलेले कामकाज पाहता ते प्रेरणादायी असेच आहे. वाढदिवसानिमित्त घेतलेला त्यांच्या वाटचालीचा संक्षिप्त मागोवा ... 

      सहकारात काम करीत असताना १ ९ ७० साली हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखान्याला परवानगी मिळाली. कारखाना नोंदणी करताना निधी जमवण्यात भरमूअण्णांचे योगदान निर्णायक होते. स्वत : च्या जमिनीवर कर्ज काढून ही रक्कम अण्णांनी सभासदांच्या शेअर्ससाठी वापरली. पहिल्या कार्यकारिणीमध्ये ते व्हाईस चेअरमन होते. पुढे काही वर्षांनी कारखान्यावर प्रशासकीय बोर्ड येऊन कार्यकारिणी बरखास्त झाली आणि अण्णांवर निलंबन आले, तो भाग वेगळा. पार्टिकल बोर्डच्या विस्तारीकरणालाही त्यांचा विरोध होता. या विरोधात त्यांनी येथील साखर आयुक्त कार्यालयावर सुरे दोन हजार कार्यकर्त्यांचा मोर्चाही नेला होता. जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना दुग्ध व्यवसायाकडे गांभीर्याने पाहिले. लोकांध्ये आर्थिक सुबत्ता यावी यासाठी गावागावातून दूधसंस्था स्थापन केल्या. आज तालुक्यात सर्वत्र दूधाचा महापूर पहायला मिळतोय, शेतकऱ्यांच्या जीवनात धवलक्रांती झालीय हे त्या दूरदृष्टीचं फलित आहे. 
    
       आपल्याकडं सप्टेंबरनंतर शेवटच्या टप्प्यात भातपिकाला पावसाचं पाणी मिळत नाही. त्यामुळं भातपिक संकटात सापडतं. यावर उपाय म्हणून ओढ्यातलं वाहतं पाणी वळवून वळण बंधारे बांधण्याची योजना सरकारच्या गळी उतरवली. ती सरकारनं स्विकारली. आज राज्यात असे हजारो बंधारे पूर्ण झाले आहेत. 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा वसंतदादांचा मंत्र भरमूअण्णांनी कृतीत आणला असेच म्हणावे लागेल. या उपविभागात उच्चशिक्षणाची मोठी गैरसोय होती. ती दूर करण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आमदार झाल्यानंतर चंदगड, कोवाड, नेसरी येथे तीन महाविद्यालये मंजूर करून दिली. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने तुर्केवाडी व आजरा येथे आयटीआय कॉलेजनां मंजुरी मिळवली. त्याचबरोबर विद्यालये काढली. विशेष म्हणजे ती सगळी त्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिली. आमदारकीच्या काळात त्यांनी गडहिंग्लजमध्ये डीवाएसपीची पोस्ट मंजूर करून घेतली. तिथचं १०० खाटांच उपजिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून प्रस्ताव पाठविला. पुढे ते रूग्णालय साकार झालं. विविध विकास कामांना चालना देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले.No comments:

Post a Comment