चंदगडी बोलीत चंदगडी संस्कृतीचे संचित सामावले आहे - प्रा. गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2023

चंदगडी बोलीत चंदगडी संस्कृतीचे संचित सामावले आहे - प्रा. गावडे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"चंदगडी बोली, चंदगडी संस्कृती यामध्ये एक विशिष्ट प्रकारची गोडी आहे. दिवाळी, शिमगा इत्यादी सणांमध्ये गायल्या जाणाऱ्या चंदगडी भाषेतील ओव्या,गाणी यामधून खरंतर स्त्रियांनी आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवली आहे. त्यामुळे चंदगडी बोलीत चंदगडी संस्कृतीचे संचित सामावले आहे." असे प्रतिपादन डाॅ.गोपाळ गावडे यांनी केले. मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत "चंदगडी : आपली भाषा, आपली संस्कृती" या विषयातून त्यांनी तिसरे पुष्प गुंफले. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा - तुर्केवाडीचे शाखा व्यवस्थापक राजीव कांबळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. 
   कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रकाश दुकळे यांनी करून दिला. 
        चंदगडी भाषा व संस्कृती याविषयी बोलताना डॉ. गावडे यांनी आवाहन केले की, ''ज्या ज्या वेळी चंदगड मधील लोक कोणत्याही प्रदेशात आपल्यासमोर येतील. त्यांनी चंदगडी भाषेतच संवाद साधावा. जेणेकरून आपली भाषा जोपासली जाईल. चंदगडी भाषेचा वापर आपल्याला मुक्त संवादासाठी करता आला पाहिजे. कुणी आपल्या भाषेला, संस्कृतीला गालबोट लावणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपली संस्कृती ही जगा आणि जगू द्या. या तत्वावर चालणारी आहे."   
         या प्रसंगी विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या  व्यक्तींचा सत्कार वाचनालयामार्फत बी. आर. फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ. प्रकाश दुकळे यांचा, वकिलीची सनद प्राप्त केल्याप्रीत्यर्थ ॲड. कार्तिक पाटील यांचा ,आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. सीमा नांदवडेकर यांचा, नाचणी उद्योगाला चालना दिल्याबद्दल गणपती पवार यांचा, दोन युद्धामध्ये शौर्य गाजवणारे व्यंकू नाईक यांचा, वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल संकेत चांदीलकर आणि सोलापूर विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आनंद सुतार यांचा सत्कार करण्यात आला.
      यावेळी कार्यक्रमास सरपंच जोतिबा आपके, एम. एम. तुपारे, सूर्याजी ओऊळकर, विष्णू कार्वेकर, नारायण पाटील, काजमिल फर्नांडिस व इतर  मान्यवर आणि बहुसंख्य वाचक ,श्रोते उपस्थिती होती.              
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड. कार्तिक पाटील यांनी केले. तर जॉनी फर्नांडिस, हेमिल फर्नांडिस,चंदा कांबळे आणि सुरेश कांबळे यांनी संयोजन केले.


No comments:

Post a Comment