हजारो भाविकांच्या उपस्थितीत रवळनाथ यात्रेला प्रारंभ, रविवारी स्थानिकांच्या यात्रेसह उत्सवाची होणार सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2023

हजारो भाविकांच्या उपस्थितीत रवळनाथ यात्रेला प्रारंभ, रविवारी स्थानिकांच्या यात्रेसह उत्सवाची होणार सांगता

 

रवळनाथ यात्रेत सहभागी झालेले भाविक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          येथील ग्रामदैवत व ८४ खेड्यांचे श्रध्दास्थान श्री रवळनाथ देवाच्या यात्रेला आज उत्साहात सुरुवात झाली. सासनकाठी, आरती व पालखी मिरवणुकीसह हजारो भाविकांच्या गर्दीत यात्रा उत्सवाला आज प्रारंभ झाला. रविवारी (ता. १२) यात्रेची सांगता होणार आहे. चंदगड तालुक्यातील भाविकांसह  आजरा, गडहिंग्लज, बेळगाव व गोवा येथील हजारो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावतात.

       सकाळपासूनच रवळनाथ मंदिराच्या परीसरात दुकानदारांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बाहेरगावाहून फिरते पाळणे, घसरगुंडी, मशीनवरील घोडे फिरणे आदी मनोरंजनाचे कार्यक्रम दिवसभर सुरु होते. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, हंबेरे, मांगलेवाडी, देसाईवाडी येथील गावची आज यात्रा असल्याने या गावातील लोक दिवसभर येथे थांबून होते. आपल्या संपूर्ण परिवारासह बाहेरगावाहून आलेले चाकरमानीही उपस्थित होते. यात्रेमध्ये महिलांची गर्दी दिसत होती. 

      पालखी मिरवणूक मार्गात अडथळा येवू नये म्हणून स्वयंसेवक भक्तांनी मानवीकडे करुन भाविकांना सुचना देत होते. दुपारी युवकांनी सासनकाठीची मिरवणूक काढली. त्यानंतर पालखीच्या पाच प्रदक्षिणा मंदिराभोवती घालण्यात आल्या. भाविक पालखी व सासनकाठीवर गुळ, खोबरे, बत्ताशे, चिरमुरे, लाडू यांची उधळण करत होते. 

      पुजारी विलास गुरव यांनी डोक्यावरील आरतीसह मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली. जिल्हा सत्र न्यायाधीश कविता आगरवाल, कोर्ट मॅनेजर श्रीमती खाडे, चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार, न्यायाधीश सी. यु. शिपकुले, तहसिलदार विनोद रणवरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, ट्रस्टचे मधुकर देसाई, इन्द्रजित सावंत-भोसले, पुजारी गोविंद गुरव यासह स्थानिक नागरिक मिरवणूकीत सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीनंतर नारळ फोडण्यात आले. गुरुवारी चाळोबा यात्रा, शुक्रवारी सातेरी व भावेश्वरी यात्रा व शनिवारी इटलाई यात्रा होते. रविवारी (ता. १२) यात्रेची सांगता होते.

No comments:

Post a Comment