चंदगड आरोग्य विभागाचे काम अविस्मरणीय - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2023

चंदगड आरोग्य विभागाचे काम अविस्मरणीय - आमदार राजेश पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        कोरोना काळात चंदगड आरोग्य विभागामध्ये मनुष्यबळ कमी असताना सुद्धा ग्रामीण रुग्णांलय व आरोग्य विभागाने केलेले कार्य आणि सध्या चालू असलेली रुग्णसेवा चंदगडची जनता कधीही विसरणार नाही, असे गौरवोद्गार  चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले. ग्रामीण रुग्णालय, चंदगड येथे आयोजित आरोग्य शिबिर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना, जागृत पालक सदृढ बालक अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

      चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने, डॉ. गजेंद्र पाटील प्रमुख उपस्थित होते.

       प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी येत्या दोन महिन्यात तालुक्यातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, आरोग्य संबंधित शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

        आमदार पाटील पुढे म्हणाले की, ``चंदगड तालुका हा माणुसकी जपणारा तालुका आहे. तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर सुद्धा आरोग्य सेवा पोहोचवली जाते. याचे श्रेय आरोग्य सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना जाते. तालुक्यात उपजिल्हा रुग्णांलयाच्या कामास लवकरच सुरुवात होत असून, चंदगड ग्रामीण रुग्णांलयाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जागरुक पालक सदृढ बालक या अभियानांचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. स्वराज्य मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल गडहिंग्लजच्या वतीने रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन गायकवाड यांनी स्वागत केले. तर समुपदेशक विनायक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ग्रामीण रुग्णांलय चंदगड व स्वराज्य मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल गडहिंग्लजचे अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment