आमच्या आत्मदहनाची वाट पाहू नका...! पाण्यासाठी कोणी दिली आर्त हाक - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2023

आमच्या आत्मदहनाची वाट पाहू नका...! पाण्यासाठी कोणी दिली आर्त हाक

पारगड जलजीवन योजनेचे काम चार दिवसात सुरू करण्याचे वर्क ऑर्डर सह लेखी पत्र २ मार्च २०२३ रोजी मिळाले होते.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       १ मार्च २०२३ रोजी चंदगड पंचायत समिती समोर पाण्याच्या मागणीसाठी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी संबंधित विभागाकडून चार दिवसात जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू करून नऊ महिन्यांत पूर्ण करण्याच्या लेखी पत्रानंतर उपोषण मागे घेतले होते. तथापि महिना उलटला तरी कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने प्रशासन आमच्या आत्मदहनाची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल रघुवीर खंडोजी शेलार व पारगड रहिवाशांनी केला आहे.

       उन्हाळ्याच्या झळा जसजशा वाढतील तसतसा पारगड वरील पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. गेली अनेक वर्षे येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याअभावी एप्रिल, मे महिन्यात गाव सोडण्याची नामुष्की ओढवते. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. भाजप राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी आंदोलकांना सरबत देऊन उपोषण थांबवले  होते.

       यावेळी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी मिरवेल ग्रामपंचायत अंतर्गत पारगड जल जीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारी रुपये- १६११३८/- इतकी सुरक्षा रक्कम केडीसीसी बँकेत चलनाने भरल्याचे तसेच रु ८० लाख ५६ हजार ९०६ च्या कामास  प्रशासकीय मंजुरी (वर्क ऑर्डर) व  काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले होते. यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, हनीफ सय्यद, पंडित कांबळे आदींसह पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे उपस्थितीत दिले होते. उपोषण समाप्तीनंतर चार दिवसात सुरु होणारे नळपाणी योजनेच्या कामासंदर्भात महिना उलटला तरी काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे निराश झालेले ग्रामस्थ आता आत्मदहनाची भाषा करू लागले आहेत.

No comments:

Post a Comment