पाणी प्रश्नी आमरण उपोषण सुरू, ........तर किल्ल्यासह गावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालण्याचीही मागणी, कोणी केली मागणी..... - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2023

पाणी प्रश्नी आमरण उपोषण सुरू, ........तर किल्ल्यासह गावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालण्याचीही मागणी, कोणी केली मागणी.....

पारगडच्या पाणी प्रश्नी चंदगड पंचायत समिती समोर उपोषणास बसलेले रघुवीर शेलार यांच्यासह महिला व ग्रामस्थ
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
            किल्ले पारगड वर पुन्हा भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याअभावी गडकऱ्यांची ससेहोलपट सुरू असून पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे. पालगडचे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करा या मागणीसाठी आज १ मार्च पासून ग्रामस्थांनी चंदगड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत इथून हलणार नाही असा ठाम निर्धार सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व ग्रामस्थांनी केला आहे.

 चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या कडे कपारीत वसलेल्या, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड वासियांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई सुरु झाली की जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी येऊन आश्वासन देऊन जातात. दरवर्षी नवे अधिकारी, नवे सर्वेक्षण, नवी आश्वासने हे चक्र ३५ वर्षे सुरूच आहे. मात्र पारगडचा पाणी प्रश्न जैसे थे आहे. यावर गतवर्षी झालेल्या सर्वेनुसार १ मार्च पासून प्रत्यक्षात काम सुरु न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी दिला होता. याची प्रशासना कडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. 
 गडावरील शिवकालीन फाटक, गुंजन, गणेश, महादेव या तलावातील पाणी पूर्वी येथील रहिवाश्याना पुरायचे. तथापि गेल्या १५-२० वर्षात रस्ता सुधारणेमुळे पर्यटकांची संख्या अनेक पटीने वाढली व पाणी अपुरे पडू लागले. अलीकडे एप्रिल च्या सुरवातीलाच सर्व तलाव कोरडे पडत आहेत. परिणामी उन्हाळ्यात ग्रामस्थांवर अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवते. याचे सोयरसूतक ना लोकप्रतिनिधींना ना पाणीपुरवठा विभागाला ना महाराष्ट्र शासनाला.
  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळाला असला तरी तो आजतागायत कागदावरच आहे. मध्यंतरी काहींनी किल्ला सुधारणेसाठी 'दत्तक' घेतल्याची आवई उठवली पण घोषणेनंतर काडीचेही काम न करता ते बेपत्ता झाले. पारगड वासियांची तहान व अन्य समस्या सोडवता येत नसतील तर किल्ल्यासह पारगड गाव, इसापूर, नामखोल, मिरवेल ही पंचक्रोशीतील गावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालावी. अशी उद्वेगजनक मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी २८ आंदोलने करूनही प्रश्न रेंगाळतोय हे खेदजनक आहे. या प्रलंबित पाणी प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष्य घालून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना व आदेश काडून हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. 
 वरील मागणीचे पत्र ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. कामाची प्रत्यक्षात सुरुवात झाल्याशिवाय उपोषण स्थळावरून हलणार नाही असा ठाम निर्धार यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.


No comments:

Post a Comment