चोरीची भिती दाखवून भामट्यांकडून महिलेच्या १ लाख २५ हजारांच्या दागिण्यावर डल्ला, कुठे घडली घटना - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2023

चोरीची भिती दाखवून भामट्यांकडून महिलेच्या १ लाख २५ हजारांच्या दागिण्यावर डल्ला, कुठे घडली घटना


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
काल या परिसरात चोरी झाली आहे. येथून दागीने घालून जाण्यास बंदी असून तसा वरून आदेश आला असल्याचे खोटे सांगून नेसरी (ता. गडहिंग्लज येथील  श्रीमती शांता श्रीकांत कोरे (वय ७८ रा. नेसरी ) या महिलेच्या गळ्यातील ५ तोळे वजनाच्या पाटल्या दोन अनोळखी इसमानी हातोहात लंपास केल्याने नेसरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली. रविवार दि. ५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता घडलेल्या या घटनेची नोंद नेसरी पोलिसात झाली आहे.
    अधिक माहिती अशी श्रीमती शांता कोरे या नेसरी येथील मनोहर खाणावळीच्या  जवळून शिक्षक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संकल्प हॉस्पिटलसमोर आल्या असता दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. यापैकी एकाने काल येथे चोरी झाली असून अंगावर दागीने घालून जाऊन नका. तसा आम्हाला वरून  आदेश आला आहे असे सांगून दागिने काढून देण्यास सांगीतले. यावेळी श्रीमती शांता यांनी हातातील अंदाजे ५ तोळ्यांच्या पाटल्या काढून हातात घेतल्या. त्याच वेळी दुसऱ्या इसमाने हातचलाकीने त्या पाटल्या बाजूला ठेवून तारेच्या पाटल्या कागदात गुंडाळून दिल्या. घरी गेल्या नंतर हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्याने श्रीमती कोरे यांना धक्काच बसला. दोघेही  संशयीत मराठी बोलणारे असून एकाने निळसर रंगाचा फुल शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. तर दुसर्‍याने राखाडी रंगाचा टि शर्ट व निळ्या रंगाची फूल पॅन्ट घातली आहे. या घटनेची नोंद नेसरी पोलिसात झाली असून अधिक तपास पो.हे. कॉ. तडवी करत आहेत.

पोलिसासमोर आव्हान -
नेसरी पोलिस स्टेन पासून अगदी १०० मिटर अंतरावर हा गुन्हा घडला आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या गुन्हाचा तात्काळ छडा लावणे पोलीसासमोर आव्हानच आहे.


No comments:

Post a Comment