मराठा समाज प्रगतीपथावर आरूढ झालेला पहायचा आहे - महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, चंदगड येथे मराठा समाजाच्या मेळावा संपन्न, चंदगड अर्बनचे केले कौतुक - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2023

मराठा समाज प्रगतीपथावर आरूढ झालेला पहायचा आहे - महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, चंदगड येथे मराठा समाजाच्या मेळावा संपन्न, चंदगड अर्बनचे केले कौतुक

चंदगड येथे मराठा समाजाच्या मेळाव्यात बोलताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, व्यासपीठावर इतर मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         आरक्षणाच्या प्रश्नावरही राजकीय नेत्यांचे एकमत झाले नाही, त्यामुळेच विशाल प्रमाणात असलेल्या मराठा समाजाचे आजपर्यंत सर्वच बाजुने नुकसान होत आहे. सत्तेपूर्वी दिलेल्या अश्वासनांचा सत्तेवर आल्यानंतर राजकिय लोकांना त्याचा विसर पडतो. त्यामुळेच वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे दुर्लक्ष झाले. बिनव्याजी कर्जाची अभिनव योजना देवेंद्र फडणवीस यांनी सुरू करून मराठा समाजाला उद्योजक बनन्याची संधी मिळवून दिली आहे. आज महाराष्ट्रात ६० हजार नवे उद्योजक झाले असून लवकरच ते लाखापर्यंत पोहचविण्याचा आमचा संकल्प आहे. असे विचार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. चंदगड येथे आयोजित मराठा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमू पाटील होते.

        प्रारंंभी प्रास्ताविक सुरेश सातवणेकर यांनी करून मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी या मेळाव्याचे आयोजन असल्याचे सांगितले. 

मराठा मेळाव्याला उपस्थित मराठा बांधव.

       नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, ``प्रामाणिकपणा हा मराठा समाजाचा गुण आहे. राज्यातील बँकानी ४ हजार कोटींची कर्जे वितरीत केली आहेत. त्यातून ३६० कोटींचा व्याज परतावा मिळाला आहे. महामंडळाचे कामकाज अत्यंत सुरळीत सुरू असून एक आठवड्याच्या आत व्याज परतावा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंदगड अर्बन बँकेने ८ कोटीची कर्जे देऊन मराठा समाजाला मदत केलेली आहे. त्यामुळे या बँकेचे अध्यक्ष व संचालक, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. या पुढच्या काळात प्रत्येक तालुक्यापर्यंत आम्ही पोहचू. तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाची बैठक घेऊन एवढेच नव्हे तर तालुकास्तरावर महामंडळाचा अधिकारी येऊन बँकेशी समन्वय साधून लाभार्थ्याना सहकार्य करेल. आम्हाला राजकारण करायचं नाही, आमचा मराठा समाज प्रगतीपथावर आरूढ झालेला पहायचा आहे. आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्र शासनामार्फत या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न आहे. मात्र यासाठी अजून मराठा तरुण - तरुणींना प्रबोधन होण्याची गरज आहे.

        नोकरीच्या मागे न लागता विशेषत : हॉटेल व्यवसायातील आमच्या तरूणांना या योजनेच्या माध्यमातून निसर्गरम्य चंदगड तालुक्यात आपले स्वतःचे उद्योग सुरू करता येतील, असे सांगून तिलारी येथील मत्स्यबीज केंद्राच्या आर्थिक तरतुदीसाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले . राज्य माथाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव करून या मंडळामार्फतउद्योग व्यवसायाना चालना मिळत असली तरी नोकरीमध्ये प्राधान्य मिळण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागात ही योजना सर्वांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून तात्काळ व्याज परतावा मिळावा, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा माजी जि.प.सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी व्यक्त केली. दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी मराठा महामंडळाच्या कार्याचे कौतुक करून यापुढच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीयभाषणात भरमू पाटील यांनी मराठा समाजाला सरकार दरबारी न्याय मिळाला पाहिजे, असे सांगून' एक मराठा... एक लाख मराठा "या घोषणेने मराठा समाज बांधून ठेवला असल्याचे सांगितले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक , जिल्हा अध्यक्ष मारूती मोरे, महादेव वांद्रे, सुरेश दळवी, मधुकर देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चंदगड अर्बनचे अध्यक्ष दयानंद काणेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ चौगुले, व्यवस्थापक राजाराम सुकये यांचा सत्कार करण्यात आला. गडहिंग्लज तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे, सचिन बल्लाळ, शांताराम पाटील, तुकाराम बेनके, प्रा. आर. पी. पाटील, रविंद्र बांदिवडेकर, नामदेव पाटील, शांताराम भिंगुर्डे आदीसह मराठा युुुवक-युवती मोठ्या संख्येेेने उपस्थित होते. संचालन ग. गो. प्रधान यांनी केले. आभार शिवाजी कुट्रे यांनी मानले.

No comments:

Post a Comment