तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शासन दरबारी मागणी करणार - आमदार राजेश पाटील, प्राथमिक शिक्षक संघ शाखा चंदगडच्या उपशाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2023

तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शासन दरबारी मागणी करणार - आमदार राजेश पाटील, प्राथमिक शिक्षक संघ शाखा चंदगडच्या उपशाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन

 

प्राथमिक शिक्षक संघ शाखा चंदगडच्या उपशाखेचे त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना आमदार राजेश पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       शिक्षणातील पावित्र्य राखण्याचे प्रामाणिक प्रयत्न शिक्षण क्षेत्रात झाले पाहिजे. आपले कार्य प्रामाणिक असेल तर आपल्याला यश निश्चित मिळते. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरकारने देण्याचे वचन दिले आहे ते पाळण्याचे सामर्थ्य त्यांना मिळावे यासाठी चंदगडच्या रवळनाथाकडे आपण साकडे घालणार असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. चंदगड तालुक्यातील शिक्षक संघाच्या उपशाखेच्यावतीने आयोजित केलेल्या ञैवार्षिक शिक्षक अधिवेशनात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

अधिवेशनाला उपस्थित शिक्षक.

         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चंदगडच्या उपशाखेच्या वतीने त्रैवार्षिक अधिवेशन महादेवराव वांद्रे सभागृहात संपन्न झाले. सुरुवातीला प्रास्ताविक शाहू पाटील यांनी केल्यानंतर संघाचे तालुकाध्यक्ष सदानंद पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, ``चंदगड तालुक्याचा मागासलेपणा पुसण्यासाठी तालुक्यातील जुन्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासाला चालना दिली. निसर्ग सौंदर्याची  खाण असणारा चंदगड तालुक्यासारखा जगाच्या पाठीवर कुठलाच तालुका नाही. या तालुक्याने जिल्ह्यात दुधाची क्रांती केली आहे. केडीसी बँकेत कर्ज वसुलीत चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुका अग्रेसर आहे.`` 

    ते पुढे म्हणाले, ``येथील सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने शासन दरबारी मागणी करून तालुक्याची पूर्तता करेन. आज जुन्या पेन्शन साठी चालू असलेल्या संघर्षात सरकारने जुनी पेन्शन देण्याचे अभिवचन दिले आहे. ते पाळण्याचे सामर्थ्य देण्यासाठी आपण चंदगडच्या रवळनाथकडे साकडे घालणार आहे. आज महाराष्ट्रात खालच्या पातळीवर चालणारे राजकारण महाराष्ट्राच्या सांस्कृतीला बादा आणत आहे. यासाठी शिक्षकांनी संस्कारक्षम पिढी घडवावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

          यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील म्हणाले, ``मंत्री पदाच्या काळात मी तालुक्यात २७ लहान-मोठे तलाव आणले. पण कुठेच हिंसक वळण लागलं नाही. त्यामुळे तालुका पाणीदार बनवण्यात मी यशस्वी झालो. इथल्या माझ्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना संस्कार घडवण्याचे कार्य शिक्षक मित्रांनी करावे. शिक्षक संघटना अधिक मजबूत करून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटी निर्माण करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.`` 

       यावेळी तालुका कार्यकारणी निवड व महिला आघाडीची निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके यांनी मनोगतातून संघटना एकीकरणासाठी सर्वांनी एक दिलाने एकत्र या अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर रघुनाथ खोत, मधुकर येसने, नंदकुमार वांईगडे, बाळासाहेब निंबाळकर, अमर वरुटे, डी. एम. पाटील, सुकुमार पाटील, महादेवराव वांद्रे, एस. एल. पाटील, पद्मजा मेंढे, संगीता खिलारे यांच्यासह शिक्षक संघाचे नेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एन. पाटील यांनी केले तर आभार दशरथ आतवाडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment