किल्ले पारगड वरील खड्ड्यांमुळे धोकादायक बनलेला घोडे दरवाजा मार्ग. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर चारचाकी वाहने चढण्यासाठी असलेल्या एकमेव 'घोडे दरवाजा' रस्त्याचे काम बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे अनेक वर्षे रखडले आहे. या रस्ता कामाला मुहूर्त कधी...? असा सवाल पारगड ग्रामस्थ व पर्यटकातून होत आहे.
सन १६७४ मध्ये छत्रपती शिवरायांनी किल्ल्याची उभारणी केल्यापासून गडावर चढण्यासाठी २४० पायऱ्यांचा एक मार्ग तर दुसरा गडाच्या आग्नेय दिशेला घोडे दरवाजातून होता. घनदाट जंगल असलेल्या या परिसरातून गडावर घोडे चढवण्यासाठी या तीन फूट दगडी बांधिव वाटेचा वापर होत होता. तब्बल सव्वा तीनशे वर्षांनी गडावरील भगवती भवानी मंदिर जीर्णोद्धार साहित्य नेण्यासाठी हा रस्ता फोडून चार चाकी वाहनांसाठी रस्ता बनवण्यात आला. चार चाकी वाहने गडावर जाऊ लागल्यामुळे गेल्या वीस पंचवीस वर्षात शिवप्रेमी पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. तथापि गेल्या तीन-चार वर्षात घोडे दरवाजा लगत वळणदार धोकादायक रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तीव्र चढण असलेल्या या रस्त्यावर दीड दोन फूट खोल खड्ड्यांमुळे गेल्या तीन-चार महिन्यापासून गडावरील वाहतूक ठप्प आहे. परिणामी पर्यटकांची संख्याही दहा टक्क्यांवर आली आहे. दुसरीकडे गडावर पाण्याचे दुर्भिक्ष असून गडावर टँकर जाणे अशक्य बनल्यामुळे पाण्याअभावी ग्रामस्थांवर अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवली आहे. याचे सोयरसुतक ना बांधकाम विभागाला आहे ना पाणीपुरवठा विभागाला.
गडाच्या पायऱ्यांपासून ते घोडे दरवाजा मार्गे फाटक तलावापर्यंत च्या सुमारे १६०० मिटर रस्ता काम मंजूर असल्याचे समजते. यातील पायऱ्यांकडील ८०० मीटर भाग मागील वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर डांबरीकरण झाला आहे. तथापि दुसरा पावसाळा आला तरी उर्वरित रस्ता कामाला सुरुवात नाही. घोडे दरवाज्याकडील रस्त्यातील धोकादायक वळणे व चढण कमी करणे, रस्ता रुंदीकरण करणे, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन यासह डांबरीकरण गरजेचे आहे. रस्ता काम तात्काळ सुरू करुन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. या प्रश्नी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवर घालून आमदार राजेश पाटील यांनी कामाला गती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व इतिहास प्रेमी पर्यटकांतून होत आहे.
No comments:
Post a Comment