एसएससी बोर्डाची पहिली बॅच कालकुंद्री येथे तब्बल ४८ वर्षानंतर एकत्र - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2023

एसएससी बोर्डाची पहिली बॅच कालकुंद्री येथे तब्बल ४८ वर्षानंतर एकत्र

 

  श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथील इयत्ता दहावी बोर्डाच्या पहिल्या बॅचचे तब्बल ४८ वर्षानंतर एकत्र आलेले विद्यार्थी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       जुनी एस. एस. सी. म्हणजे अकरावी बंद झाल्यानंतर सन १९७४-७५ मध्ये दहावी एस एस सी बोर्ड अस्तित्वात आला. श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथील इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तब्बल ४८ वर्षानंतर एकत्र आले. पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेळगावसह देशाच्या कानाकोपऱ्यातून तर काही गावात राहणारे हे वर्ग मित्रांनी याची देही एकत्र आले. इतक्या प्रदीर्घ काळानंतर होणारा विद्यार्थ्यांचा हा तालुक्यातील पहिला मेळावा असावा. आपल्या शिक्षकां समवेत स्नेह मेळावा साजरा केला. अध्यक्षस्थानी  माजी विद्यार्थी व बेळगाव येथील अक्षता अंडरवॉटर सर्विसेसचे मालक अशोक कल्लाप्पा पाटील हे होते.

       स्वागत वर्गमित्र व सेवानिवृत्त आर्मी अधिकारी राजाराम मोहनगेकर कुदनुर यांनी केले. सुरुवातीस दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित तत्कालीन शिक्षक बाबुराव मुतकेकर, जी एस पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगतातून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील प्रसंग व आठवणींना उजाळा दिला. एकमेकाच्या जीवनातील सुखदुखांच्या गोष्टी सांगत असताना सर्वजण भारावून गेले.  तर काहींचे कंठ दाटून आले. यावेळी ॲड जेरॉन करवाल, उद्योजक मरगुनी पुंडलिक पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी महादेव ज्योती पाटील, किशन देसाई, इम्तियाज हुसेन मोमीन, जोतिबा सुबराव पाटील, पिराजी परीट, वसंत तुकाराम पाटील, कारेकर, भीमराव गडकरी, नारायण पाटील, सौ सरोजिनी विजय पाटील, सौ एलिझाबेथ डिसोझा, श्रीमती गोदावरी आदी वर्गमित्र उपस्थित होते. शेवटी जड अंतकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. यावेळी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एल बेळगावकर उपस्थित होते. माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुंडोपंत देसाई यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment