प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक संघ शिष्टमंडळाची आमदार राजेश पाटील यांच्याशी चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2023

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक संघ शिष्टमंडळाची आमदार राजेश पाटील यांच्याशी चर्चा

प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन आमदार राजेश पाटील यांना देताना प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील व पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
       महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) शाखा चंदगडच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने शिक्षकांच्या विविध प्रलंबित व बदल्या संदर्भातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चंदगड चे आमदार राजेश पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली. चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात दिनांक २३ मे रोजी ही भेट घेण्यात आली.
   देण्यात आलेल्या निवेदनात सहावा व सातवा वेतन आयोग पडताळणी कॅम्प चंदगड येथे ठेवण्यात यावा, अतिरिक्त होणाऱ्या समाजशास्त्र विषय शिक्षकांना संरक्षण मिळवून द्यावे, तसेच रिव्हर्शन घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना तशी संधी उपलब्ध करून द्यावी, बदली प्रक्रियेत शून्य शिक्षक होणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक नेमावेत, मुख्याध्यापक प्रमोशन साठी ३० जून २०२३ ही तारीख निश्चित करून मुख्याध्यापकांना लवकरात लवकर प्रमोशन द्यावे, चंदगड तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित बिलांसाठी तात्काळ निधीची उपलब्धता करावी, नवीन शिक्षक भरती तात्काळ करून रिक्त जागी त्यांना नेमणूक द्याव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे.
   निवेदनावर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आमदार पाटील यांच्याशी प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. याला आमदार आणि सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना फोन लावून आग्रही सूचना केल्या. आपल्या स्तरावर सर्व प्रश्नांचे निराकरण  करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.


No comments:

Post a Comment