तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथील कु. स्नेहा रामचंद्र पाटील यांनी जैवतंत्रज्ञान या विषयात पी.एच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे. स्नेहा हिने "अल्झायमर रोगाच्या उपचारासाठी प्रभावी औषधी वनस्पतींचे जैवतांत्रिक विश्लेषण केले. "Biotechnological interventions of potent medicinal plants for the treatment of Alzheimer disease" या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन पूर्ण केले.
हे संशोधन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील जैवतंत्रज्ञान विभागात पूर्ण करण्यात आले. या संशोधन कार्यासाठी त्यांना मार्गदर्शक प्रा. ज्योती पी. जाधव (प्रभारी प्र. कुलगुरू शिवाजी विद्यापीठ )यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्नेहा पाटील यांच्या संशोधनात अल्झायमर रोगाच्या उपचारासाठी औषधी वनस्पतींमधील जैवसक्रिय घटकांचा अभ्यास करून त्यांच्या संभाव्य उपयोगाचे वैज्ञानिक मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे अल्झायमर सारख्या न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजाराच्या उपचारासाठी नैसर्गिक स्रोतांवर आधारित नवीन उपचार पद्धती विकसित करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांनी विद्यापीठासह कोल्हापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या मानात भर घातली आहे.

No comments:
Post a Comment