महागाव / सी. एल. वृत्तसेवा
संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बांबू स्प्लिटर मशीन प्रकल्प तयार केला आहे. सध्या बांबू हा अभियांत्रिकी मध्ये धातूला पर्याय म्हणून वापर करत आहेत, तसेच बाजारात बांबूला वाढती मागणी असून त्यामुळे बांबू लागवड वाढीस लागलेली आहे. बांबू पासून अनेक वस्तू तयार करता येतात. तसेच बांबू पासून कंपोझिट मटेरियल, फर्निचर, कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने बनवता येतात. पण त्यावर प्राथमिक स्वरूपातील प्रक्रिया करण्यासाठी बांबूचे ऊभे आणि आडवे तुकडे करणे गरजेचे असते. तसेच बांबू लांबीला २०-२५ फुटांपेक्षा जास्त असतो तसेच बांबूचा घेरी वेगवेगळी असते. आणि नैसर्गिक रित्या बांबू चिवट व कठीण असतो. त्यामुळे आवश्यक मापात तुकडे करण्यासाठी मशीनची गरज भासते.
असे मशीन तयार करणे ही काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी, प्रथम बांबू प्रक्रिया व उद्योग यातील समस्या जाणून घेतल्या यासाठी प्रथम अश्वघोष बांबू रोपवाटिका, पेरणोली (ता.आजरा) व बांबोरियम येथे भेटी दिल्या. त्यामध्ये बांबू प्रथम लहान लहान भागांमध्ये तुकडे करणे, तसेच बांबू मधील गाठी काढणे, बांबूचे वरील आवरण काढणे, बांबू पट्टी तयार करणे ,ही आव्हानातमक कामे आहेत हे लक्षात आले. याकरिता मशीनची गरज लागते, या कामी फार मनुष्यबळ व पारंपारिक पद्धतीने काम चालत असे, मात्र त्यामुळे हाताला ईजा होणे, कामासाठी जास्त वेळ लागणे, मोठ्या उत्पादनात मर्यादा येणे या बाबी समोर आल्या, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला.यात विश्वजीत कमलाकर (हुपरी) व सतीश कांबळे (पेरनोली) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर प्रकल्पामध्ये बांबू एकूण चार भागांमध्ये उभा कापला जातो यासाठी एक एचपी मोटर वापरले आहे. तसेच सदर मोटर सिंगल फेजवर चालू शकते त्यासाठी व्हीएफडी उपकरण वापरले आहे. तसेच रीडक्शन गिअर बॉक्स चा वापर केला आहे. त्यामुळे बांबू पुढे ढकलण्यासाठी मदत होते एका बाजूला चार पात्यांची युनिट जोडलेले आहे. त्यामुळे बांबू चार भागांमध्ये विभागला जातो या ठिकाणी आपण पात्यांची संख्या वाढवून बांबू अनेक भागांमध्ये विभागून कापू शकतो. प्रायोगिक तत्त्वावर आपण या मशीनमध्ये सध्या तीन फुटांपर्यंत बांबू उभा कापू शकतो किंवा तुकडे करू शकतो तसेच या मशीनवर आणखी एका मोटरचा वापर करून आडवे बांबू आपण कापू शकतो, तसेच ग्राइंडिंग व्हीलचा वापर करून आपण बांबू मधील गाठी काढू शकतो. अशा पद्धतीने एका मशीनवर आपण बांबूसंबंधी तिन्ही कामे करू शकतो. तसेच या प्रकल्पावर शोध प्रबंध तयार करण्याचे काम चालू आहे. भविष्यात मोटरची शक्ती वाढवून व मशीन ची लांबी वाढवून आपण मोठे बांबू तुकडीकरण व कापणी करू शकतो. सदर प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रकल्प मार्गदर्शक प्रा. अतुल देशपांडे, विभाग प्रमुख व्ही. आर. घाडगे, प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कु. ऋतुराज धातुंडे, कु. अनिकेत चौगले, कु. भूषण हलबगोळ, कु.उत्कर्ष बर्गे यांनी प्रकल्प सादर केला. भविष्यात या प्रकल्पामध्ये आधुनिकीकरण करून त्याचा जास्तीत जास्त फायदा बांबू उद्योग व प्रक्रियेत कसा करता येईल हा हेतू आहे.
No comments:
Post a Comment