प्रा. बसवंत पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
'धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट' कोल्हापूर च्या वतीने दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार प्रा बसवंत मल्लाप्पा पाटील, कसबा बावडा, कोल्हापूर यांना नुकताच जाहीर झाला आहे. प्रा पाटील यांचे मुळगाव चिंचणे, ता चंदगड असून पुरस्कार निवडीची माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकराजा राजर्षी शाहूंचे विचार आदर्श मानून प्रा. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात समाजाच्या जडणघडणीत उदात्त हेतूने करत असलेल्या कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने ट्रस्टने घेतली आहे.
धम्म भवन ट्रस्ट तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीमाई फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विभूतींना अभिप्रेत राष्ट् उभारणीसाठी समाज प्रबोधन चळवळीत अग्रेसर आहे. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, ३ हजार रुपयांची ग्रंथ पुस्तके, सन्मानचिन्ह, मानपत्र असे आहे. पुरस्कार वितरण रविवार १८ जून २०२३ रोजी दुपारी १२.१५ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते विद्रोही शाहीर संभाजी भगत, प्रा. बाबुराव गुरव, अभिजित बिचुकले, प्रा. टी. के. सरगर, विजया कांबळे, छाया पाटील, दिग्दर्शक माहेश्वर तेटांबे, फोटोग्राफर राजवीर जाधव, अमर पारखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पत्रकार परिषदेस डॉ. निकिता चांडक, डॉ. स्नेहल माळी, अनिरुद्ध कांबळे, अरहंत मिणचेकर, नामदेव मोरे, अनघा सुतार, अनुष्का माने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment