चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव येथून कुटुंबासोबत फिरायला आलेले दोन सख्खे भाऊ हाजगोळी (ता. चंदगड) हद्दीत तिलारी धरणाच्या जलाशयात शनिवार दिनांक १० रोजी सायंकाळी बुडाले होते. त्यांचे मृतदेह तब्बल ३० तासानंतर चंदगड पोलिसांच्या रेस्क्यू टीमला सापडले. या दुर्घटनेत रेहान आफताब खान (वय १५) व मुस्तफा आफताब खान (वय १२, राहणार मद्रास स्ट्रीट, कॅम्प बेळगाव) या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची वर्दी अब्दुल्ला मोहम्मद रफीक बेपारी कॅम्प बेळगाव यांनी चंदगड पोलिसात दिली होती. पाऊस आणि अंधारामुळे शोध मोहिमेत व्यत्यय आल्याने मृतदेह लवकर सापडू शकले नाहीत. रविवारी उशिरा मृतदेह सापडले.
याबाबत चंदगड पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, बेळगाव येथील आफताब खान पत्नी व मुलांना घेऊन सहलीचा आनंद लुटण्यासाठी तिलारी मुख्य धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आले होते. दुपारचे जेवण आटोपून महादेव मंदिर नजीक पाण्यात खेळताना अंदाज न आल्याने मुस्तफा व रेहान दोघेही पाण्यात बुडाले. आई-वडिलांचा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आरडाओरड करूनही परिसर निर्जन असल्याने कोणीही मदतीला धावून आले नाही. परिणामी दोन्ही सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती समजतात चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पानबुड्यांना पाचारण करून त्यांच्या साह्याने रेस्क्यू टीम मार्फत जलाशयात शोध घेण्यात आला याला तब्बल ३० तासानंतर यश लाभले. रेस्क्यू टीम मधील पीएसआय कारंडे, अमोल पाटील, आनंदराव देसाई, भदर्गे, राज किल्लेदार आदींनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यांना चंदगड तालुका रेस्क्यू टीम, बेळगाव रेस्क्यू टीम यांचे सहकार्य लाभले.
गेल्या काही वर्षात किटवाड, तिलारी, आंबोली परिसरात येणाऱ्या विशेषतः बेळगावच्या डझनभर पर्यटकांनी आपले जीव गमावले आहेत. अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत यासाठी पर्यटकांनी सावधगिरी बाळगूनच सहलीचा आनंद लुटावा, असे आवाहन पोलीस स्टेशन चंदगडच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment