चालत्या मोटरसायकल मधून बाहेर आला ट्रिंकेट साप...! चालकाची उडाली भंबेरी - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2023

चालत्या मोटरसायकल मधून बाहेर आला ट्रिंकेट साप...! चालकाची उडाली भंबेरी

मोटरसायकल मध्ये लपलेला ट्रिंकेट जातीचा साप काढून दाखवताना सर्पमित्र सौरभ पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       चालत्या मोटारसायकलच्या हेडलाईटच्या फटीतून बाहेर पडून एखादा साप पेट्रोल टॅंक वर बसून चालकाकडे पाहू लागला तर चालकाची भीतीने कशी गाळण उडेल याची कल्पनाच केलेली बरी...! पण असा थरारक अनुभव कळसगादे (ता. चंदगड) शाळेतील प्राथमिक शिक्षक नित्यानंद हुद्दार यांना याची देही याची डोळा प्रत्यक्षात आला. यावेळी त्यांची भीतीने भंबेरी उडाली नसती तरच नवल.

        त्याचे झाले असे, करेकुंडी गावचे रहिवाशी नित्यानंद हुद्दार हे कळसगादे (ता. चंदगड) येथील शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आपल्या मोटरसायकल वरून ढोलगरवाडी गौळवाडी, पाटणे फाटा मार्गे शाळेकडे जाण्यासाठी आपल्या मोटरसायकल वरून निघाले. सोबत पाटणे फाटा येथे शाळेसाठी जाणारा ढोलगरवाडीतील एक विद्यार्थीही बसला होता. गौळवाडी गाव ओलांडून गाडी मुख्य रस्त्याला आली तेवढ्यात आधीच गाडीच्या आश्रयास बसलेला एक साप  हेडलॅम्पच्या फटीतून अचानक पेट्रोल टाकीवर येऊन बसला. चालत्या गाडीवर समोर सापाला पाहताच हुद्दार यांची भंबेरी उडाली. काय करावे कळेना हॅण्डल सोडून उडी मारावी तर मागे एक विद्यार्थी मागे बसला होता. त्यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली व रस्त्याकडेला पार्क केली. तेवढ्यात साप सीट खाली लपला. 

         योगायोगाने तिथून ढोलगरवाडी येथील सर्पमित्र सौरभ पाटील चालले होते. त्यांना हा प्रकार समजताच गाडी नजीकच्या सर्विसिंग सेंटरवर घेत सीट खोलून आत लपलेल्या सापाला बाहेर शिताफीने काढले. पाटील यांनी हा साप ट्रिंकेट जातीचा आहे. याचे मराठी नाव 'नानेटी' असून तो बिनविषारी असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. पावसाळ्याच्या सुरुवातीला सापांच्या बिळात पाणी भरल्यामुळे साप दुसरीकडे आश्रय शोधत असतात. अशावेळी साप दुचाकी किंवा चार चाकी वाहनांमध्ये आश्रय घेण्याची शक्यता असते त्यामुळे गाडी वापरासाठी बाहेर काढताना शक्यतो 'तपासूनच' वापर करावा. असे आवाहन सर्पमित्र पाटील यांच्यासह नित्यानंद हुद्दार यांनी एव्हाना हा प्रकार पाहण्यासाठी बऱ्यापैकी जमलेल्या बघ्यांना तसेच वाहनधारकांना केले. त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात अलगद सोडून देण्यात आले.

सी. एल. न्युजची मालिका वाचून सापांविषयी जाणून घ्या.....

        सापांविषयी अधिक माहीती जाणून घेण्यासाठी चंदगड लाईव्ह न्युज अर्थात सी. एल. न्युजने  २६ जुलै २०२० रोजी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग -१ - सापाचे नाव - नाग (कोब्रा) प्रसिध्द केलेली ४० भागांची मालिका आपण पाहू शकता. Linkhttps://www.chandgadlivenews.com/2020/07/blog-post_930.html

No comments:

Post a Comment