विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देत वाचनालयाला पुस्तके भेट, कालकुंद्री येथील संजय कांबळे यांचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2023

विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देत वाचनालयाला पुस्तके भेट, कालकुंद्री येथील संजय कांबळे यांचा उपक्रम

कालकुंद्री येथील सार्वजनिक वाचनालयास विवाहानिमित्त पुस्तके प्रदान करताना संजय कांबळे यावेळी उपस्थित वाचनालयाचे अध्यक्ष व ग्रामस्थ.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कालकुंद्री (ता. चंदगड) येथील संजय मारुती कांबळे यांचा विवाह नुकताच पार पडला. विवाह समारंभातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी या रकमेतून गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास २८ पुस्तके देणगी दिली. वाचनाची आवड असलेले संजय कांबळे ज्ञानदीप वाचनालयाचे नियमित वाचक आहेत. वाचन चळवळ वाढावी, गावातील सार्वजनिक वाचनालय समृद्ध व्हावे या भावनेतून त्यांनी ही पुस्तके भेट दिली.

     दिलेल्या २८ दर्जेदार पुस्तकांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङमय,  समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र २४ खंड, महात्मा जोतीराव फुले समग्र वाङमय, भगवद्गीता आदी पुस्तकांचा समावेश आहे. पुस्तक प्रदान कार्यक्रमास ॲड रोहित राव (यवतमाळ), प्रा मिलिंद रहावले (गोंदिया), अक्षय मोरे (नागपूर), विनोद कांबळे, विशाल कांबळे, अनंत पाटील, यशवंत पाटील आदींची उपस्थिती होती. वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील यांनी आभार मानून संजय कांबळे यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. 

  यापूर्वीही गावातील अनेक तरुण व ग्रामस्थांनी आपला वाढदिवस, मुला मुलींचा वाढदिवस, विवाहाचा वाढदिवस, आई-वडिलांचे पुण्यस्मरण अशाप्रसंगी वाचनालयाला शेकडो पुस्तके, टेबल, कपाट आदी फर्निचर देऊन वाचनालय समृद्ध करण्याबरोबरच वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी हातभार लावला आहे.

No comments:

Post a Comment