चंदगड अर्बन बँकेच्या निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यानेच नगरसेवक हळदणकर यांचे उपोषण, उपोषणामागचे सुत्रधार दुसरेच : नगराध्यक्षा प्राची काणेकर यांचा आरोप - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2023

चंदगड अर्बन बँकेच्या निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यानेच नगरसेवक हळदणकर यांचे उपोषण, उपोषणामागचे सुत्रधार दुसरेच : नगराध्यक्षा प्राची काणेकर यांचा आरोप

पत्रकार परिषदेला उपस्थित नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला व नगरसेवक.

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

          विरोधकांना विरोधक न मानता विकास निधी देताना प्रत्येक प्रभागात समान निधी दिला. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच नगरपंचायत सभागृहाच्या मंजुरीनेच विकासकामे केली आहेत. त्यामुळे काही लोकांना चंदगड चा विकास बघुन पोटशूळ उठले आहे. चंदगड अर्बन बँकेच्या निवडणुकीतील झालेला पराभव जिव्हारी लागल्यानेच नगरसेवक बाळासाहेब हळदणकर हे उपोषण करत असून या उपोषणाचे पडद्यामागील सुत्रधार दुसरेच आहेत. त्यामुळे त्यानी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून त्यांचे हे उपोषण म्हणजे केवळ नौटंकी असल्याचा आरोप नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांनी केला. त्या चंदगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. प्रारंभी प्रास्ताविक करून उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी विकास कामे ही नियमानुसार होत आहेत. त्यामुळे विरोधकांना आता आरोप करण्यासारखा मुद्दाच उरला नाही, म्हणूनच उपोषण चे नाटक करत असल्याचे सांगितले. 

       नगराध्यक्षा काणेकर पुढे म्हणाल्या ``विकासकामे करताना चंदगड शहरातील सर्व प्रभागांत समान निधींचे वाटप केले आहे. असे असताना नगरसेवक हळदणकर काही लोकांच्या सांगण्यावरून प्रत्येक प्रभागात ढवळाढवळ करत आहेत. यामुळे सर्व नगरसेवक त्यांच्यावर नाराज आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरासाठी १५ कोटींचा निधी आला आहे. गावाने मला निवडून दिले आहे. विकासाचा पुळका असणाऱ्या हळदणकर यांनी स्वतःच्या प्रभागासाठी निधीची कधीही मागणी केली नसल्याचे काणेकर यांनी सांगितले. प्रशासनाने निधी वळविण्यासाठी हळदणकर यांना पत्र दिले असले तरी कोणत्याही परिस्थितीत आपण मंजुरी देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील वाचनालयातही भ्रष्टाचार केला असून त्याचे इतिवृत्त नगरसेवक हळदणकर यांनी गायब केल्याचा आरोप करून बेकायदेशीर नळ पाणी कनेक्शन घेणाऱ्या आणि घरपट्टी न भरणाऱ्यांना पाठीशी घालणारे नगरविकासकडून निधी बदलून आणू शकतात. मग उपोषण करायची नगरसेवक हळदणकर यांच्यावर का वेळ येते, याचेही चिंतन करण्याची गरज असल्याचे यावेळी प्राची काणेकर म्हणल्या.

        तर विकासासाठी नागरिकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे आमच्या प्रभागातील विकासाची कोणीही काळजी करू नये, असा सल्ला नगरसेवक नेत्रदीपा कांबळे यांनी दिला. अस्वच्छता आणि रहदारीमुळे शहराच्या प्रवेशद्वारावर मच्छी व्यावसायिकांना नगरपंचायतीच्या गाळ्यात व्यवसाय सुरू करण्यास सांगितले असता त्यातही हळदणकर यांनी राजकरण केल्याचा आरोप नगरसेवक झाकीर नाईक यांनी केला.

          चंदगड शहरात येणाऱ्या महिलांची गैरसोय टाळावी यासाठी छ. संभाजी चौकातील स्वच्छता गृहाच्या कामातही - आडकाठी घातल्यामुळे तो निधी पडून -असल्याचे नगरसेवक अभिजित गुरबे यांनी सांगितले. यावेळी चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद काणेकर, नगरसेवक अनिता परीट, अनुसया दाणी, माधुरी कुंभार, माजी नगरसेवक मेहताब नाईक, सुकाणू समिती सदस्य, संजय चंदगडकर, राजेंद्र परीट,प्रमोद कांबळे, अशोक दाणी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment