माणगाव येथील स्मशान शेड जवळ कचरा..! दुर्गंधीचे साम्राज्य, स्वच्छतेची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2023

माणगाव येथील स्मशान शेड जवळ कचरा..! दुर्गंधीचे साम्राज्य, स्वच्छतेची गरज

 

माणगाव ग्रामपंचायतीचा स्मशानशेड

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        माणगाव (ता. चंदगड) येथील लकिकट्टे रोड नजीक उभारण्यात आलेल्या स्मशान शेड जवळ कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृताच्या नातेवाईकांना याचा प्रचंड त्रास होत असून माणगाव ग्रामपंचायतीने या ठिकणचा कचरा हटवून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे.

   माणगाव हे चंदगड तालुक्यातील मध्यवर्ती व बाजारपेठेचे गाव आहे. मोठी लोकसंख्या असूनही गेली अनेक वर्षे गावात अंत्यविधीसाठी स्मशान शेड नव्हते. परिणामी पावसाळ्यात गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांची मोठी कुचंबना होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने माणगाव - लकिकट्टे मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील माळावर स्मशान शेड उभारले आहे. मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या स्मशान शेडला लागूनच कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. 

       मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यासाठी  शेडमध्ये अद्याप बिडाची जाळी बसवलेली नाही. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने बसवण्यासाठी एक जाळी आणून ठेवली होती. पण स्मशानशेड ग्रामस्थांच्या नजरेपासून दूर अंतरावर असल्याचा गैरफायदा उठवत बसवण्यापूर्वीच ही जाळी भंगारवाल्यांनी लंपास केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. स्मशान शेड मधील गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ बिडाची जाळी बसवावी. येथे टाकण्यात येणारा कचरा तात्काळ थांबवावा. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नियोजन करावे. सध्या असलेले स्मशान शेड अत्यंत छोटे व अपूरे असल्यामुळे नातेवाईकांना पाऊस किंवा उन्हापासून सुरक्षित उभे राहण्यासाठी विस्तारित निवारा शेड बांधावे अशी मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment