संजय गांधी विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे केंद्र - केंद्र प्रमुख विलास पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2023

संजय गांधी विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे केंद्र - केंद्र प्रमुख विलास पाटील

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालय हे तालुक्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे केंद्र बनले आहे. त्यामुळे या शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढीस लागला आहे. अशा शाळेमध्ये बी. एड पदवी धारकांना शालेय अनुभव कार्यक्रमासाठी संधी मिळणे. हे भावी शिक्षकांचे भाग्यच असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख विलास पाटील यांनी केले.

       ते नागणवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयात महादेवराव बी. एड. कॉलेज तुर्केवाडीच्या जिजामाता गट क्रमांक एकच्या शालेय अनुभव कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी या शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर होते.

         यावेळी प्रमुख वक्ते प्रा. ग. गो. प्रधान म्हणाले, ``देशाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शिक्षकांची गरज आहे. कारण एक गुणवत्तापूर्ण शिक्षकच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतो. यासाठी देशातील सर्व शिक्षक शिक्षण देणारी महाविद्यालये दर्जेदार बनली पाहिजेत. म्हणजे त्यातून बाहेर पडणारे शिक्षक ही गुणवत्ता पूर्ण निर्माण होतील आणि त्यातून निश्चितच देशातील शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होईल. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार होत आहे. त्यामुळे शिक्षणापुढेही विविध आव्हाने उभी राहिली आहेत. ती आव्हाने पेलणा-या शिक्षकांची आज गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविणाऱ्या शिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे.

       जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. मुख्याध्यापक  एम. आर. भोगुलकर यांनी सर्व भावी शिक्षकांना त्यांच्या या प्रात्यक्षिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी के. डी. बारवेलकर, एस. एस. गुरव, तुकाराम तुप्पट व या शाळेतील इतर सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सर्व विद्यार्थी व महादेवराव बीएड कॉलेजचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या गटाच्या मुख्याध्यापिका मैथिली पाटील यांनी व सुत्रसंचालन मयुरी कांडर यानी केले तर आभार सुरेखा कोळी यांनी मानले.

No comments:

Post a Comment