|
आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील |
चंदगड तालुक्यामध्ये के. एल. ई. चे युनीट पाटणे फाटा येथे सुरु होत आहे. त्यानिमित्त आज त्या वास्तुमध्ये वास्तुशांती करण्यात आली. हे युनीट चंदगड तालुक्यात व्हावे, यासाठी गुडेवाडीचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांच्या प्रयत्नातून लवकरच सुरु होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.
ईवलेसे रोप लावियेले द्वारी ||
त्याचा वेलू गेला गगनावरी ||
संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाची प्रचिती आज खऱ्या अर्थाने चंदगड वासियांना येत आहे. कारण ही तसेच आहे ते म्हणजे चंदगड मधील आरोग्य व्यवस्थेमध्ये के. एल. इ. संस्थेने सुरू केलेली पायाभरणी.
खऱ्या अर्थाने केएलई हॉस्पिटलची चंदगड मधील ही चळवळ साधारणतः एक ते दीड वर्षांपूर्वी सुरू झाली. आणि ती सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणारा चंदगड तालुक्यातील गुडेवाडी गावचा एक ध्येयवेडा तरुण होता. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील घार फिरे आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी
माता जाते चाकरीशी चित्त तिचे लेकरापाशी
प्रमाणे डॉ. पाटील यांचे देशाच्या कृषी क्षेत्रात भरीव योगदान आहे. ते दिल्लीमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था वरती शासनाचे सल्लागार म्हणून काम करत आहेत. मात्र हे करत असताना त्यांना आपल्या तालुक्याची ओढ काही केल्या स्वस्त बसू देत नव्हती आणि त्यामुळे आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचे म्हणून ते प्रयत्न करू लागले. कोरोना काळात चंदगड मधील लोकांना आरोग्याच्या दृष्टीने मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यासाठी त्यांनी देशातील मोठ्या हॉस्पिटलपैकी एक असणाऱ्या के. एल. ई. हॉस्पिटलचे चेअरमन प्रभाकर कोरे यांच्याशी संपर्क केला व चंदगड मधील लोकांना आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा मिळवण्यासाठी काय मार्ग काढता येईल यावर चर्चा केली.
डॉ. कोरे यांनी प्रश्नाचे गांभीर्य ओळखले होते आणि त्यांना सुद्धा आर्थिक परिस्थिती नसलेल्या लोकांनाही अत्याधुनिक सुविधांचा उपयोग करून घेता यावा. यासाठी आपले हॉस्पिटल चंदगडमध्ये व्हावे अशी इच्छा होतीच. त्या सुप्त इच्छेला जागृत करून कार्यरत करण्याचं काम डॉ. परशराम पाटील यांनी केले आणि त्याचं पहिले पाऊल म्हणून चंदगड मधून सुनील शिंदे, संदीप गावडे, सुनील वायदंडे, तेजस सरशेट्टी व रोहित पाटील अशा ५ जनसंपर्क अधिकारी (पी. आर. ओ.) यांची नेमणूक के. एल. ई. हॉस्पिटल कडून करण्यात आली. या पी आर ओ नी आपल्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
संपूर्ण तालुक्यातून हजारो पेशंटच्यावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना, विविध विमा योजना, ECHS, ESI अशा अनेक योजनांच्या माध्यमातून के. एल. ई हॉस्पिटल बेळगाव येथे यशस्वीपणे केल्या. विशेष म्हणजे अशा कोणत्या योजनेमध्ये उपचार खर्च बसत नसेल आणि तो पेशंट परिस्थितीमुळे उपचार घेऊ शकत नसेल तर के एल इ हॉस्पिटलच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पेशंट वरती अगदी अल्प दरात उपचार वा शस्त्रक्रिया केल्या जाऊ लागल्या.
हे सुरू असतानाच चंदगड मधील पेशंट के एल ई हॉस्पिटल बेळगाव येथे पोहोचायला बराच कालावधी जायचा. त्यामुळे ही समस्या डॉ. पाटील यांनी के एल इ चे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कानावर घातली आणि तात्काळ डॉ. कोरे यांनी चंदगड मधील रुग्णांसाठी चंदगड ते के एल इ हॉस्पिटल बेळगाव व कोवाड ते बेळगाव अशी मोफत बस सेवा सुरू केली. आज अनेक गरजू पेशंट या बसचा मोफत लाभ घेत आहेत.
यातील तिसरा आणि महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे चंदगड मधील पेशंट वरती चंदगड मध्येच उपचार व्हावेत अशी डॉ. पाटील यांनी डॉ. कोरे यांच्याकडे विनंती केली आणि तात्काळ पुन्हा एकदा डॉ. कोरे यांनी ही विनंती मान्य करत पाटणे फाटा येथे के. एल. ई. चे वेलनेस हॉस्पिटल सुरू करण्यास मान्यता दिली. कोणताही नफा तोटा याचे गणित न मांडता लोकांना अत्याधुनिक सुविधा मिळावी. या उद्देशाने हे हॉस्पिटल पाटणे फाटा येथे सुरू होत आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये ओपीडी बेस वर अल्प दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
या हॉस्पिटलमुळे चंदगड मधील स्थानिक 20 ते 25 लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या पुढील काळात गरजेनुसार या सुविधा वाढवण्यात येतील त्याचबरोबर रोजगारात ही वाढ होईल.
मात्र एवढे करूनही के एल इ हॉस्पिटल चे चेअरमन प्रभाकर कोरे आणि डॉ. परशराम पाटील थांबले नाहीत तर चंदगड मध्ये एक मल्टी स्पेशलिटी असणारे असं मोठं हॉस्पिटल व्हावं. ही अजूनही त्यांची तळमळ सुरू आहे आणि त्यासाठी सर्वांसाठी सोयीस्कर अशा जागेची चाचपणी सुरू आहे. एकदा जागा फायनल झाली की डॉ. कोरे आणि डॉ. पाटील यांनी चंदगडच्या आरोग्यसेवेचे पाहिलेलं एक स्वप्न लवकरच सत्यात उतरेल आणि चंदगडच्या आरोग्य सेवेमध्ये ते एक मैलाचा दगड ठरेल यात तीळ मात्र शंका नाही.
मिले सुर मेरा तुम्हारा याप्रमाणे डॉ. प्रभाकर कोरे आणि डॉ. परशराम पाटील या दोघांचा सुर मिळाल्याने आज चंदगड तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एक अमुलाग्र बदल होताना निश्चितपणे दिसत आहे. त्यांच्या या कार्यामुळे संपूर्ण चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुका नेहमीच त्यांचा ऋणी राहील. आज हा लेखन प्रपंच करण्याचे कारण ही तसे महत्त्वाचे आहे. आज १ ऑगस्ट या दिवशी के. एल. इ. सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कोरे यांचा वाढदिवस आहे. अशा या आरोग्य सेवेतील देवदूत असलेल्या थोर व्यक्तिमत्त्वाला दीर्घायुष्य लाभो व त्यांच्याकडून अशीच जनतेची सेवा घडत राहो याच या वाढदिनी शुभेच्छा.
शब्दांकन - सुनील शिंदे, नांदवडे (जनसंपर्क अधिकारी, पी. आर. ओ.) |
सुनिल शिंदे |
(के. ए.ल इ. वेलनेस हॉस्पिटल, पाटणे फाटा, ता. चंदगड).
No comments:
Post a Comment