चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
इब्राहिमपूर (ता.चंदगड) येथील यशवंत रामु हरेर यांनी अलिबाग सारख्या पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असलेल्या ठिकाणी हाॅटेल व्यवसायात केलेल्या परिश्रमाचे फलित म्हणून त्याना कोकणनामा प्रतिष्ठानचा "महाराष्ट्र हॉटेल सम्राट - २०२३" या राज्यस्तरीय पुरस्काराने अलिबाग येथील हॉटेल गुरुप्रसादच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण समारंभासाठी लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे उपाध्यक्ष, तसेच उद्योजक नितीन अधिकारी, नायब तहसीलदार श्रीकांत कवळे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, नाट्य - चित्रपट अभिनेते, साहित्यिक शरद कोरडे, साहित्यिक उमाजी केळुसकर, योगिता केळुसकर, आरती डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण भागातून येऊनही महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात झळकणारे साहित्यिक, आगरी सामाजिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे आणि महाराष्ट्र पातळीवर आपल्या संघटन कौशल्यामुळे सुप्रसिद्ध असलेले मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर - पेझारीचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे या दोघांना कोकण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आंबेपूर - पेझारी येथील मॉर्निंग वॉक ग्रुपचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार मॉर्निंग वॉक ग्रुपचे कार्याध्यक्ष मोहन मंचुके, सचिव जी. सी. पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील आणि इतर पदाधिकारी, सदस्यांनी स्वीकारला सत्कारमूर्ती यांनी यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात कवी नंदू तळकर यांनी लायन्स हेल्थ फाऊंडेशनला २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय भगत यांनी केले.
No comments:
Post a Comment