कुदनूर येथील नामदेव लोहार 'जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील' पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2023

कुदनूर येथील नामदेव लोहार 'जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील' पुरस्काराने सन्मानित

 

आदर्श पोलीस पाटील पुरस्काराचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारताना नामदेव लोहार.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कुदनूर येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील म्हणून चंदगड तालुक्याला परिचित असलेल्या नामदेव अर्जुन लोहार यांना महाराष्ट्र राज्य महसूल दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

      महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. गावोगावी कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती काळात मदत कार्य, महसूल वसुली, मतदार याद्या अद्यावत करणे, विविध निवडणूकांचा कार्यक्रम प्रक्रियेची अंमलबजावणी तसेच नियमित होणाऱ्या दैनंदिन कामकाजामध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे ओळखून जिल्ह्यातील महसूल क्षेत्राशी निगडित आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन इतर कर्मचाऱ्यांना चांगल्या कार्यासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका महाराष्ट्र महसूल, वन विभाग व जिल्हाधिकार्यालय कोल्हापूर यांनी घेतली.  यात गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्ह्यातील आदर्श पोलीस पाटील यांना गौरवण्यात आले. 

       यात चंदगड तहसील कार्यालय अंतर्गत कुदनूर येथील पोलीस पाटील नामदेव अर्जुन लोहार यांची अभिनंदनीय निवड झाली. गेली १० वर्षे लोहार यांनी कुदनुर सारख्या अति संवेदनशील गावात पोलीस पाटील म्हणून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उठवला आहे. महसूल दिनानिमित्त नुकतेच त्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल लोहार यांचे चंदगड तालुक्यात कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment