जाफराबाद/जालना : सी. एल. वृत्तसेवा
ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट मधील सरळ सेवेची १८ संवर्गातील तब्बल १९४६० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या पदांच्या भरतीसाठी अवाजवी परीक्षा शुल्क करण्यात येत असल्याने इच्छुक उमेदवारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात तहसील कार्यालय जाफराबाद (जिल्हा जालना) यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
मार्च २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणु प्रादुर्भावाची पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे . दीर्घ कालावधी नंतर शासनातर्फे भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या बेरोजगारीमुळे उमेदवारांची अर्ज भरताना आर्थिक टंचाईमुळे परीक्षा शुल्क भरायची ही ऐपत राहिलेली नाही. परिक्षा देणारे अनेक उमेदवार शेतकरी पुत्र ग्रामीण भागातुन आहे. आधीच शेती व्यवसाय संकटात आल्याने तुटपुंज्या पैशावर ते दिवस काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.
काही दिवसांपूर्वी पोलीस भरती घोटाळासमोर आला व आता वनरक्षक भरतीचा पेपर फुटी पाहायला मिळाली. येणाऱ्या काळात तलाठी भरती सुद्धा आहे. तथापि पेपर फुटी घटना जास्त वाढल्याने आपण या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच वनरक्षक भरतीचा जो पेपर फुटला तो पेपर पुन्हा घेऊन तरुणांना दिलासा द्यावा. परीक्षा शुल्क कमी करून, परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्याव्या असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सुनील फदाट, हर्षल मोतीराम पाटील- फदाट, संदेश फदाट, ओम खंदाडे आदींच्या सह्या असून निवेदन देताना यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment