निर्भीड पत्रकार, विद्यार्थी प्रिय शिक्षक व प्राचार्य ना. सि. घोलप यांचे आकस्मिक निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2023

निर्भीड पत्रकार, विद्यार्थी प्रिय शिक्षक व प्राचार्य ना. सि. घोलप यांचे आकस्मिक निधन

 

ना. सि. घोलप

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       मथळ्यापासूनच वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या निर्भीड आणि मुद्देसूद बातम्या हि त्यांची खासियत होती. छ. शिवाजी विद्यालय महागाव (ता. गडहिंग्लज) येथील विद्यार्थी प्रिय शिक्षक ते प्राचार्य म्हणून जनमानसात आदराचे स्थान निर्माण केलेल्या पत्रकार ना. सि. घोलप यांचे आज दि. १२ ऑगस्ट २०२३ रोजी हृदयविकाराने झालेले आकस्मिक निधन सर्वांसाठी धक्कादायक होते. 

         सकाळी शाळेत ज्ञानदानाचा आपला तास आटोपून स्वातंत्र्य दिन व त्यापूर्वी सलग दोन दिवस शाळा आवारात होणाऱ्या ध्वजारोहणाच्या तयारीकडे वळत असतानाच त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तथापि उपचाराचा पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. 

      शाहूवाडी तालुक्यातील सरूड हे मूळ गाव असले तरी घोलप हे महागाव पंचक्रोशी व गडहिंग्लज तालुक्यात असे मिसळून गेले होते, की अनेकांना ते महागाव येथीलच मुळचे रहिवाशी वाटायचे. एक उत्कृष्ट शिक्षक ते प्राचार्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या घोलप यांनी एका दैनिकाचे पत्रकार म्हणून आपल्या निर्भीड, समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांतूनही जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. मराठी पत्रकार परिषदेचे ते सदस्य होते. 

        विद्यार्थी, पालक व मित्रमंडळींसोबत त्यांचे आदर युक्त बोलणे त्यांच्या माघारीही चर्चेचा विषय असायचा. येत्या काही महिन्यातच ते सेवानिवृत्त होणार होते. एक उत्कृष्ट शिक्षक व निष्कलंक पत्रकार अचानक काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे गडहिंग्लज उपविभागात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव असा परिवार आहे. त्यांच्या मूळ गावी सरुड येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

  मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार ना सि घोलप यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

No comments:

Post a Comment