दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर, किल्ले पारगड पंचक्रोशीतील मावळ्यांचे मुख्यमंत्री, वनमंत्री, पालक मंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2023

दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर, किल्ले पारगड पंचक्रोशीतील मावळ्यांचे मुख्यमंत्री, वनमंत्री, पालक मंत्र्यांना निवेदन

पारगडचे संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

     चंदगड तालुक्यातील पारगड किल्ला व परिसर प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयाच्या हद्दीवर शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला इतिहास प्रसिद्ध किल्ला आहे. हा ग्रामीण दुर्गम भाग विकासापासून कित्येक वर्षांपासून वंचित राहिला आहे. येथील नागरिकांचे अद्याप कधीच न सुटलेले प्रश्न तातडीने सोडवावे व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या मागणीचे निवेदन पंचक्रोशीतील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, वनमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री यांना दिले आहे.

        रस्ते, आरोग्य सुविधा, पाणी नाही. ग्रुप ग्रामपंचायत पारगड, नामखोल, मिरवेल पाणी प्रश्न ५ वर्षात अनेक वेळा उपोषणे करूनही सुटला नाही. रा.मा. १८७ मोर्ले- पारगड घाट सेक्शन नसलेला रस्ता गेल्या ३ वर्षापासून कॉन्ट्रक्टर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदारपणामुळे बंद आहे. हा मार्ग झाला तर पन्नास खेडयांचा विकास होणार आहे. तसेच वनहक्कासंदर्भाच्या अनुषंगाने कुंब्री प्लॉटचे दावे नियम ५ व ६ नुसार दावे करुन ४ वर्ष पुर्ण झाली तरी सदरचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. दोन्ही जिल्हयाच्या जनतेला आमरण उपोषणे, आंदोलने करून संघर्ष करावा लागतो, त्यावेळी अधिकारी लेखी आश्वासन देवून वेळ मारुन नेतात. असे अनेक पुरावे आमच्या जवळ आहेत. 

       किल्ले पारगड पर्यटन स्थळ म्हणून घोषीत असून ते कागदावरच आहे. वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे विकास खुंटला आहे. अशा अनेक गंभीर समस्यांना भारत स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष झाली तरी जनतेला संघर्ष करावा लागत आहे. याचा विचार मंत्री महोदयांनी गांभीयांने करावा. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनासोबत ऐतिहासिक दस्तावेज, ब्रिटिश कालीन सनदा, मानधन इ. बाबत पुरावे, सन १६७४ ची किल्लेवासियांची वतन यादी, किल्ले पारगड नकाशा, वनमंत्री महोदयांनी आता पर्यंत दिलेली पत्रे, पुरातन विभागाचे पत्रव्यवहार इ. कागदपत्रे, सन १९३४ चा वहिवाट असलेला ७/१२ उतारा अशी महत्त्वाची कागदपत्रे जोडली आहेत.

No comments:

Post a Comment