आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत चंदगड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा संपन्न, दर्जेदार व वेळेत विकासकामे पूर्ण करण्याच्या सूचना; सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2026

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत चंदगड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा संपन्न, दर्जेदार व वेळेत विकासकामे पूर्ण करण्याच्या सूचना; सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज उत्साहात पार पडली. या सभेला आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपस्थित राहून नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. शहराचा नियोजनबद्ध, शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

    सभेत सर्व प्रभागांतील विकासकामांची सद्यस्थिती, कामांची गुणवत्ता, तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती सादर करण्यात आली. क्रीडा संकुलाचा सर्वांगीण विकास, रवळनाथ मंदिर परिसरात यात्रेकरूंसाठी प्रस्तावित निवास व्यवस्था, शहरातील कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना, रहदारी व्यवस्थेतील सुधारणा, नमो उद्यानाचा विकास, आधुनिक वाचनालयाची उभारणी व बळकटीकरण, तसेच चंदगड शहराचा आगामी विकास आराखडा या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

        यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी विविध विकासकामांचा प्रगती अहवाल सादर केला. आमदार शिवाजीराव पाटील यांनी विकासकामे दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देत नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    यावेळी विरोधी गटनेते नवीद अत्तार, सार्वजनिक बांधकाम कमिटीचे सभापती अजिंक्य पिळणकर, पाणीपुरवठा सभापती माधवी शेलार, महिला व बालकल्याण सभापती आयेशा नाईकवाडी यांनीही विविध विकास कामासंदर्भात मार्गदर्शन केले. 

        सभेला चंदगड नगरपंचायतीचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज सुर्वे, नगराध्यक्ष सुनील काणेकर, उपनगराध्यक्षा आयेशा नायकवडी, नगरसेवक प्रमोद कांबळे, संजय चंदगडकर, सुभाष गावडे, सुधीर पिळणकर, सिकंदर नाईक, सानिया आगा, जयश्री वनकुंद्रे, सुधा गुरबे, सचिन सातवणेकर, अबुजर मदार, एकता दड्डीकर, सुचिता कुंभार, शितल कट्टी, गायत्री बल्लाळ तसेच शांतारामबापू पाटील, पंचायत समिती सदस्य रविंद्र बांदिवडेकर, सुरेश सातवणेकर, सचिन बल्लाळ, संभाजी देसाई, अशोक कदम, प्रकाश सूर्यवंशी, अरुण पाटील, सर्व नगरसेवक-नगरसेविका, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       सभेच्या अखेरीस चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने, लोकसहभागातून आणि गतिमान कामकाजाच्या माध्यमातून विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

                                        बातमीदार - राजेंद्र शिवनगेकर

No comments:

Post a Comment