आरोग्य आणि शिक्षण गरिबांच्या घरी पोहोचविणार - चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन, पाटणे फाटा येथे के. एल. ई. वेलनेस हॉस्पिटलचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2023

आरोग्य आणि शिक्षण गरिबांच्या घरी पोहोचविणार - चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन, पाटणे फाटा येथे के. एल. ई. वेलनेस हॉस्पिटलचा शुभारंभ

पाटणे फाटा येथे के एल ई वेलनेस हॉस्पिटलचा शुभारंभ प्रसंगी बोलताना चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे 
 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुका हा बेळगावच्या जवळ असूनही लांब होता. या ठिकाणी के. एल. ई. हॉस्पिटल काढण्याचा मानस अनेक वर्षापासून होता. मात्र कुणीतरी स्थानिक व्यक्तीने पुढाकार घेणे गरजेचे होते. डॉ. परशराम पाटील यांच्याकडून आम्हाला तसा प्रतिसाद मिळाल्याने कमी वेळेत आम्हाला येथे हॉस्पिटल उभारण्याची संधी मिळाली. या ठिकाणी केवळ उपचारच नव्हे तर उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन ही केले जाणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य व शिक्षण गरीबांच्या घरी पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन प्रभाकर कोरे यांनी केले. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे के. एल. ई. च्या वेलनेस हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


        पाटणे फाटा येथे के एल ई सोसायटीने पैसे कमावण्यासाठी हॉस्पिटल चालू केले नसून रुग्णांची आणि चंदगड तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी हे हॉस्पिटल स्थापन केले आहे. शिक्षण व सेवा देणे हे के एल ईचे ब्रीद वाक्य आहे. के एल ई कडे पैशाची कमतरता नाही. आज पर्यंत कोट्यावधी लोकांना के एल ई सोसायटीमार्फत फुकट सेवा देण्यात आली आहे.``
        चंदगड तालुक्यातील जनतेनेही या संपूर्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत ते पुढे म्हणाले, ``चंदगडच्या थंड हवेने बेळगाव थंड होते. चंदगड आणि बेळगाव वेगवेगळ्या राज्यात जरी असले तरी हितसंबंध जवळचे आहेत. फार वर्षांपूर्वी इथे कॉलेज सुरू करण्याचा के. एल. ई चा प्रयत्न झाला होता. के. एल. ई. ने कृषी विज्ञान केंद्र बेळगाव जिल्ह्यात सुरू केले आहे. दोन कृषी विज्ञान केंद्र एकाच जिल्ह्यात असलेला हा बेळगाव जिल्हा आहे. ही केंद्रे शरद पवार यांनी मंजूर केली आहेत. 

        1915 साली लावलेले के एल ईचे  रोपटे. त्याचा आज जो वटवृक्ष झाला आहे. 306 कॉलेज, हॉस्पिटल आज के एल ई च्या मालकीची आहेत. 13000 सभासद असलेली ही संस्था आहे. कोणताही पक्ष जात पात काहीही न पाहता के एल ई चे काम सुरू आहे. खेड्यातला मुलगा डॉक्टर होतो व शहरात जातो. तो खेड्यात काम करण्यासाठी तयार होत नाही. अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र गुडेवाडी सारख्या खेडेगावातील मुलगा डाॅ. परशराम पाटील यांनी देशासाठी कृषीतज्ञ म्हणून काम करत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे हि त्यांची तळमळ आहे. याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे सांगितले.``

         प्रारंभी पाटणे फाट्यावर सुसज्ज तयार करण्यात आलेल्या या वेलनेस हॉस्पिटलचे डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. नितीन गंगाने, डॉ. व्ही डी पाटील, डॉ. परशराम पाटील, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

         डॉ. व्ही डी पाटील म्हणाले, 24 तास ॲम्बुलन्स सेवा, इमर्जन्सी सेवा या ठिकाणी उपलब्ध केली आहे. एक दोन वर्षात संपूर्ण सोयीनुक्त हॉस्पिटल व कॉलेज या ठिकाणी सुरू करण्याचा के एल ई चा प्रयत्न आहे. डॉ. परशराम पाटील म्हणाले, तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न प्रलंबित होता. कुठलाही देश आरोग्याकडे दुर्लक्ष करून मोठा झाला नाही. चंदगडच्या दृष्टीने ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. यात कुणाचेही श्रेय नाही.  


         डॉ. नितीन गंगाने यांनी मनाला प्रसन्नता वाटेल असे हॉस्पिटल या ठिकाणी तयार झाले आहे. भविष्यात 100% उपचार येथेच होतील असं हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र सोडून राज्याबाहेर फक्त के एल ई  मध्ये उपलब्ध आहे. असे सांगितले. 

       यावेळी पीडी पाटील, दयानंद गावडे, बेळगावचे माजी महापौर विजय मोरे, विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. एम. दयानंद, महांतेश कवटगीमठ, गोपाळराव पाटील, शांताराम पाटील, शिवाजी सावंत, के. बी. पाटील, नितीन पाटील, तुकाराम बेनके यांच्यासह परिसरातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम पाटील व मनीषा सरनाईक यांनी केले. आभार डॉ. निरंजना महांतशेट्टी यांनी मानले.

डाॅ. प्रभाकर कोरे 
       उत्तम सेवेसाठी  साथ द्या - डाॅ. प्रभाकर कोरे

       चंदगड भागात उपचार न मिळाल्यामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे या लोकांसाठी आपण काही करता येईल का या भावनेतून आज हा छोटेसे हॉस्पिटल चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे उभे केले आहे. या ठिकाणी आम्ही पैसे कमवण्यासाठी येत नाही तर चंदगड तालुक्यातील लोकांची सेवा करण्यासाठी येत आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांनी आमच्या डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी उपचार घ्यावेत. तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठीच हे हॉस्पिटल उभारले असून जनतेने साथ द्यावी असे आवाहन डाॅ. कोरे यांनी केले. 

No comments:

Post a Comment