चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे. विद्यार्थांनी सुसंस्कारित मुल्यांची जोपासना करावी. आई, वडील आणि गुरुजी तसेच समाजातील थोरा-मोठ्या लोकांच्या बरोबर काय आणि कसे आदराने बोलावे. समाजातील वाईट प्रवृत्ती पासून दूर राहून आणि गोरगरीबांची सुख-दुखे: समजून घेवून प्रामाणिकपणे काम करणे म्हणजेच शिक्षण होय, असे विचार पत्रकार विजयकुमार कांबळे यांनी व्यक्त केले.
ते अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिव -शक्ती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित केलेल्या नवागतांचे स्वागत आणि मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्हि. एन. सुर्यवंशी होते.
प्रारंभी विद्येची देवता सरस्वती देवी च्या फोटो प्रतिमेचे पूजन प्राचार्य सुर्यवंशी, विजयकुमार कांबळे,बी.जी. हिसेबकर एस. एन पाटील, प्रा. रामदास बिर्जे, प्रा. एम. पी. पाटील आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना पत्रकार कांबळे म्हणाले, ``आजच्या या मोबाईल, व इंटरनेट च्या युगात माणसेच आपली नाती-गोती, आणि माती विसरत चालली आहेत. आई-बाबाना जुन्या घरात किंवा वृद्धाश्रमात पाठवून आपण मात्र बायको मुलांबरोबर आलीशान बंगल्यात ऐश आरामात रहातात. इतकेच नव्हे तर त्यांच्या अंत्ययात्रेला देखील उपस्थित रहात नाहीत अशा उच्च शिक्षीतांचे शिक्षण काय कामाचे? असे सांगून आपण कोण आहोत, काय करणार? याचे भान ठेवून अभ्यास करावा आणि सुसंस्कारित मुल्यांची जोपासना करावी असे विद्यार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले.``
यावेळी भाग्यश्री मेंगुलकर, सानिका पारसे, सुरज पारसे, वनिता गावडे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुर्यवंशी सरानी आपल्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शैक्षणिक वाटचालीच्या गुणवत्तेबाबतची माहिती सांगितली. स्वागत प्रा. एम. पी. पाटील यांनी तर प्रास्ताविक प्रा. रामदास बिरजे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. एस. एन. पाटील यांनी. प्रा. व्हि. पी. पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment