सातवणेत ऊसाचे ६ ट्रॅक्टर अडवले, उद्या पासून अडकूर परिसरातील ऊस तोडी फडात जाऊन रोखणार...! कार्यकर्त्यांचा निर्धार - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2023

सातवणेत ऊसाचे ६ ट्रॅक्टर अडवले, उद्या पासून अडकूर परिसरातील ऊस तोडी फडात जाऊन रोखणार...! कार्यकर्त्यांचा निर्धार

सातवणे (ता. चंदगड) येथे अडवलेल्या उसाच्या ट्रॅक्टरना वाट करून देताना पोलीस
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गतवर्षीचे एफआरपीप्रमाणे टनास ४०० रुपये व चालू गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत सातवणे (ता. चंदगड) येथे शेतकरी व कार्यकर्त्यांनी उसाची वाहने रोखून आंदोलन केले.
      चंदगड तालुक्यातील  हेमरस  व दौलत कारखाना सुरू झाल्यामुळे ठीक ठिकाणी तोड सुरू आहे. सातवणेत आज दि १४/११/२०२३ सायंकाळी ७ च्या सुमारास दौलत कडे सुरू असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. त्यामुळे सातवणेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उसाने भरलेली सहा ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी रोखून धरली, पण चंदगड पोलीस ठाण्यामार्फत कारखानदारांना व ऊस वाहतूकदारांना  सुरक्षा पुरवली जात आहे. त्या सहा वाहनांच्या पुढे कारखान्याचे कामगार व पोलीस  वाहने तैनात होती. 
     कार्यकर्त्यांना पोलिसांनी दमदाटी करत वाहनांना काय केला तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यातूनही  कार्यकर्त्यांनी  पोलिसांशी हुजत घालत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारखानदारांना पाठीशी घालत आहे. शेतकऱ्याचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न चालवत आहे. आजपर्यंत कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या  जीवावर नफा मिळवला त्यामुळे खाल्ल्या मिठाला जागा नाहीतर याचा परिणाम वाईट होईल असे सांगत घोषणाबाजी केली. यावेळी तुमच्या मागण्या योग्य असल्या तरी तुम्ही फडात जाऊन ऊस तोड रोखा.  उसाने भरलेली वाहने अडवल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल असे पोलिसांनी सांगितले. यावर मागण्या मान्य झाल्याशिवाय साखर  कारखाने सुरू करू देणार नाही. उद्यापासून         
      अडकूर परिसरात कुठेही ऊसतोड सुरू असली तर ती फडात जाऊन ती ऊसतोड बंद पाडणार. असा एकमुखी निर्णय घेतला. त्यातूनही वाहने ऊस भरून रस्त्यावर आली तर आमच्यावर कितीही गुन्हे झाले तरी वाहनांच्या चाकातील हवा काढून वाहने रोखू ...!असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 


No comments:

Post a Comment