कालकुंद्री येथील १५ जणांवर गुन्हे...! ऊसाचा ट्रॅक्टर रोखल्याने पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2023

कालकुंद्री येथील १५ जणांवर गुन्हे...! ऊसाचा ट्रॅक्टर रोखल्याने पोलिसांची कारवाई

कालकुंद्री (ता. चंदगड) एसटी स्टँड चौकात झालेल्या गर्दीचे रुपांतर कोपरा सभेत करण्यात आले.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम- हेमरस कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर सोमवार दि १३ रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामस्थ व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे अडवला होता. वाहनाला साधा स्पर्शही केलेला नसताना यातील १५ निरपराध शेतकरी व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केल्यामुळे शेतकरी वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गत हंगामातील ४०० रुपये तर चालू गळीत हंगामात उसाला प्रति टन किमान ३५०० रुपये दर जाहीर करावा या रास्त मागणीसाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद राज्यात ठीकठिकाणी उमटत आहेत. दराबाबत ठोस निर्णयापूर्वीच तुर्केवाडी परिसरातून ट्रॅक्टर ऊस भरून कारखान्याकडे चालला होता. तो संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी कालकुंद्री गावाशेजारी अडवला. काही वेळातच आंदोलनाच्या ठिकाणी मोठा जमाव गोळा झाला. सायंकाळी सात नंतर चंदगडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलिसांच्या अधिक कुमकेसह घटना स्थळी दाखल झाले.       यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील हे सुद्धा आंदोलन स्थळी दाखल झाले. सायंकाळी सात नंतर पुन्हा प्रचंड मोठा जमाव  एसटी स्टँड चौकात जमला. जमावाचे रूपांतर सभेत करत दीपक पाटील यांनी संबोधित केले. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. अशा स्फोटक परिस्थितीत ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचा निषेध करण्यात आला. शेवटी ट्रॅक्टर कारखान्याकडे न सोडता पोलीस बंदोबस्तात आल्या पावली परत पाठवण्यात आला होता. 
     मंगळवारी पोलिसांनी जमावातील अशोक रामू पाटील, भरत बाबू पाटील, परशराम यल्लाप्पा पाटील, विजय नारायण पाटील, केदारी यल्लाप्पा पाटील, धोंडीबा गणपती पाटील, नरसू हनमंत पाटील, सुभाष कृष्णा पाटील, मारुती शंकर पाटील, कलाप्पा रामू पाटील, कल्लाप्पा लक्ष्मण पाटील पुंडलिक मारुती कोकितकर, गजानन अशोक राजगोळकर, शंकर कल्लाप्पा मुर्डेकर, विष्णू लक्ष्मण पाटील यांच्यावर गुन्हे नोंद केल्याचे समजते. यातील बहुतांश जणांचा घटनेशी काही संबंध नव्हता. एसटीने स्टँडवर उतरून  घरी चालत जाणाऱ्यांचेही नाव यात गोवण्यात आल्याचे म्हटले जाते. सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत असून याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात. याकडे ग्रामस्थ शेतकरी यांचे लक्ष आहे.


No comments:

Post a Comment